Hardik Patel WhatsApp Bio Change: हार्दिक पटेलचा 'भगवा' अवतार! व्हॉट्सअॅप बायोमधून काँग्रेस गायब
काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या नाराजीचे कारण राज्य नेतृत्व असल्याचे सांगितले होते.
Hardik Patel WhatsApp Bio Change: राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. आपापल्या सोयी-सुविधा आणि नफा-नुकसानाच्या जोरावर येथे लोक एकमेकांपासून वेगळे होतात किंवा भेटतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अनेकदा युती धर्माच्या सक्तीचा हवाला देऊन अशा नात्यांमध्ये चढ-उतार होतात. अशा स्थितीत आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly Elections) हार्दिक पटेल (Hardik Patel) बाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
हार्दिक पटेल लवकरचं काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हॉट्सअॅपवर पोस्ट केलेल्या त्याच्या नव्या फोटोच्या अटकळांना जोर आला आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन डीपीमध्ये (डिस्प्ले पिक्चर) हार्दिक पटेल भगवा गमछा परिधान केलेला दिसत आहे. हार्दिक पटेलने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामचा डिस्प्ले फोटो बदलला आहे. (हेही वाचा - Prashant Kishore: प्रशांत किशोरवर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता, जनपथवर बैठक सुरू)
हार्दिक पटेलच्या पक्ष बदलाच्या बातम्यांनी जोर पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हार्दिक पटेल सध्या गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. मात्र काही काळापासून ते पक्षाच्या हायकमांडवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था नव्या वराची नसबंदी केल्यासारखी झाली असल्याचेही त्यांनी मागे म्हटले होते. पक्षात निर्णय घेण्याची ताकद नाही, असंही त्यांनी त्यावेळी हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वीच हार्दिकने स्वतःला राम भक्त म्हणवून घेतले होते. खरं तर, हार्दिकने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या विधीसाठी चार हजार भगवत गीता वाटल्याचे सांगितले होते. त्यावेळी हार्दिक पटेलने आम्ही हिंदू धर्माचे आहोत आणि आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले होते.
भाजपचे केले कौतुक -
हार्दिक पटेल स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या नाराजीचे कारण राज्य नेतृत्व असल्याचे सांगितले होते. हार्दिकने काही दिवसांपूर्वी भाजपचे कौतुकही केले होते. स्थानिक नेतृत्वामुळे त्रस्त झालेल्या पटेल यांनी यानंतर हायकमांडचीही भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी आपल्याच पक्षाच्या ढिसाळ कारभाराबाबत आवाज उठवला होता.