खुशखबर! बुलेट ट्रेन साठी नोकर भरती सुरु, जपानमध्ये प्रशिक्षण; NHSRCL ने जारी केली जाहिरात, जाणून घ्या पदे
2022 मध्ये बुलेट ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे.
मोदी सरकारचे अनेक प्रकल्प आले आणि गेले, मात्र बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्प चांगलाच गाजला. सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. भरतीनंतर या लोकांना स्पेशल ट्रेनिंगही दिले जाणार आहे.
स्टेशन ऑपरेशन्स, ट्रेन ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अशा मिड लेव्हल पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या लोकांना ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्सचे लीडर म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. निवडलेल्या लोकांना, हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर संबंधित ही संस्था चालवणे आणि ऑपरेशन्स, देखरेखीसाठी नव्याने भरती केल्या जाणाऱ्या इतरांना प्रशिक्षण देणे अशी जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर NHSRCL लवकरच 28 चालकांची भरतीही करणार आहे. (हेही वाचा: हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते आहे -शिवसेना)
निवडलेल्या लोकांना वडोदरा येथील हाय स्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षित दिले जाईल, जपान येथेही खास प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी अर्ज करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तिला जपानी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. जपानी तज्ञांच्या अंदाजानुसार, बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कर्मचारी आवश्यक आहेत. यामध्ये लोकोमोटिव्ह ड्रायव्हर्स, गार्डस, स्टेशन कर्मचारी, ऑपरेशन कंट्रोल सेंटर कर्मचारी, देखभाल कर्मचारी, सिग्नल देखरेख करणारे व विद्युतीय कर्मचारी अशा पदांचा समावेश आहे.