West Bengal: धक्कादायक! मोबाईल फोन चार्ज करताना बसला विजेचा शॉक; तीन जणांचा जागीच मृत्यू

या मुलाचे ओरडणे ऐकून शेजारी त्यांच्या घराकडे धावले व त्यांना तिघांचेही मृतदेह खाली पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले,

Mobile Phone (Photo Credits: Pixabay)

याआधी मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) घडलेल्या अनेक दुर्घटना कानी आल्या आहेत. आता पश्चिम बंगालच्या (West Bengal) कोलकाता (Kolkata) येथून अशीच एक बातमी समोर येत आहे. या ठिकाणी मंगळवारी एकाच कुटुंबातील तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. राज्यात मंगळवारी मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. या कुटुंबाच्या घरातही पाणी शिरले होते. घरात राहणाऱ्या व्यक्तीने मोबाईल चार्ज करण्यासाठी लावताच संपूर्ण घरात करंट पसरला आणि 10 वर्षांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, वीज कनेक्शन तोडून सर्व मृतदेह बाहेर काढले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कोलकातापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या खरदाह येथे बराच पाऊस झाला. या दरम्यान अनेक घरे पाण्याने भरली होती. राज दास हा एक ड्रायव्हर असून तो आपल्या कुटुंबासह खरदाह येथे राहत होता. त्याच्या घरातही पावसाचे पाणी शिरले होते. त्याचवेळी दासने आपल सेल फोन चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये तो प्लग करण्याचा प्रयत्न करताच, त्याला विजेचा धक्का बसला. राज दास यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आणि 10 वर्षांचा मुलगा पुढे सरसावले, त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा: Bengaluru Suicide Case: बंगळूरूमध्ये मुलींना फाशी देत आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, यात मोठ्या मुलीचा मृत्यू)

या अपघातामध्ये त्यांचा 4 वर्षांचा मुलगा बेडवर असल्याने तो बचावला. या मुलाचे ओरडणे ऐकून शेजारी त्यांच्या घराकडे धावले व त्यांना तिघांचेही मृतदेह खाली पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, वीज कनेक्शन तोडले आणि मृतदेह ताब्यात घेतले. कोलकातासह पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीपासून आणि सोमवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या मते, कोलकाता आणि आसपासच्या भागात रविवार-सोमवार दरम्यान सुमारे 160 मिमी पाऊस पडला, जो या हंगामातील तिसरा सर्वात मोठा पाऊस आहे.