शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष Wasim Rizvi यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म; झाले Harbir Narayan singh Tyagi असे नामांतर

काही दिवसांपूर्वी रिझवी यांनी त्यांचे मृत्युपत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात यावे

Wasim Rizvi (Photo Credits: Twitter)

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे (Shia Waqf Board) माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी आज इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादमधील डासनाच्या देवी मंदिरात यती नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश करून घेतला. यावेळी यती नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत, वसीम रिझवी त्यागी समाजात सामील होणार आहेत. त्यांनी सांगितले की रिझवी यांचे नाव आता हरबीर नारायण सिंह त्यागी (Harbir Narayan Singh Tyagi) असेल. रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली होती.

महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी मंदिरात वसीम रिझवी यांच्या खांद्यावर भगवी शाल पांघरून स्वागत केले. यानंतर वसीम रिझवी त्यागी बिरादरीमध्ये सामील होणार हे निश्चित झाले. वसीम रिझवी यांना नवीन नाव मिळाले. नामकरण समारंभानंतर मंदिरात विधी पार पडला.

हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर वसीम रिझवी म्हणाले, 'येथे धर्मांतराची कोणती बाब नाही. जेव्हा मला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले, तेव्हा मी कोणता धर्म स्वीकारावा हा माझा निर्णय आहे. सनातन धर्म हा जगातील पहिला धर्म आहे. इतर कोणत्याही धर्मात न दिसणारा चांगुलपणा, माणुसकी या धर्मात दिसते. म्हणून आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे.’

वसीम रिझवी अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे आणि कृत्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी रिझवी यांनी त्यांचे मृत्युपत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात यावे. यती नरसिंहानंद यांनी आपल्या चितेला अग्नी द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. याआधी वसीम रिझवी यांनी एक व्हिडीओ जारी त्यांना, ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात असल्याचे सांगितले होते. (हेही वाचा: President Ramnath Kovind Raigad Visit: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 35 वर्षानी रायगडावर)

व्हिडिओ मेसेजमध्ये ते म्हणाले होते की, 'माझा गुन्हा एवढाच आहे की, मी कुराणच्या 26 आयतांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मुस्लिमांना मला मारायचे आहे आणि त्यांनी मला कोणत्याही कब्रस्तानात जागा देणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे मी मेल्यानंतर माझे अंतिम संस्कार झाले पाहिजेत.’