'No Skirt, Torn Jeans': स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स नकोच! वृंदावन मंदिर व्यवस्थापनाने असे अवाहन का केले? घ्या जाणून
No Skirt, Torn Jeans: वृंदावनमधील बांकेबिहारी मंदिर भक्तांना मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मिनी स्कर्ट आणि फाटलेल्या जीन्ससारखे पोशाख टाळून विनम्रपणे कपडे घालण्याचे आवाहन करते.
नवीन वर्षापूर्वी गर्दी वाढण्याच्या शक्यतेने, वृंदावन येथील ठाकूर बांकेबिहारी मंदिराने (Bankebihari Temple Dress Code) अभ्यागतांना मंदिर परिसरात माफक पोशाख मानकांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मंदिरातील अधिकाऱ्यांनी भाविकांना मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, अर्धी पँट (No Skirt, Torn Jeans) आणि नाईट सूट यासारखे पोशाख (Vrindavan Temple Guidelines) घालणे टाळण्याची विनंती केली आहे. असे कपडे पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा कमी करतात यावर मंदिर प्रशासनाने भर दिला आहे. हे आवाहन संपूर्ण वृंदावनमध्ये, विशेषतः मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर, तसेच प्रसारमाध्यमांद्वारे लावलेल्या फलकांद्वारे प्रसारित केले गेले आहे. त्यावर भाविकांचा प्रतिसाद कसा मिळतो याबाबत उत्सुकता आहे.
सांस्कृतिक प्रतिष्ठा जपण्यासाठी निर्बंध?
बांकेबिहारी मंदिर व्यवस्थापक मुनीश शर्मा यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमाचा उद्देश पूज्य स्थळाची सांस्कृतिक प्रतिष्ठा राखणे हा आहे. मंदिर व्यवस्थापनाचे अवाहन अधिक विस्तारीतपणे सांगताना आणि त्याचे समर्थन करताना शर्मा यांनी म्हटले की, आम्ही पाहिले आहे की काही भक्त, विशेषतः प्रदेशाबाहेरील पर्यटक, अनेकदा जीन्स आणि टी-शर्टसारख्या अनौपचारिक पोशाखात येतात. ते सामान्य पर्यटकांचे कपडे असले तरी ते मंदिराच्या आदर आणि श्रद्धेच्या परंपरेशी जुळत नाहीत. (हेही वाचा, Mathura's Banke Bihari Temple Dress Code: 'मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स घालून प्रवेश नाही'; मथुरेच्या बांके बिहारी मंदिराने भक्तांसाठी लागू केला ड्रेस कोड)
भाविकांसाठी एक पवित्र ठिकाण
वृंदावनमधील बांकेबिहारी मंदिर हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक ठिकाण आहे, जे दरवर्षी भारतभरातून आणि परदेशातून हजारो भाविकांना आकर्षित करते. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले की परिसराचे पावित्र्य राखणे ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि अभ्यागतांना त्यांच्या कपड्यांच्या निवडीद्वारे पारंपारिक मूल्यांचा आदर करण्याचे आवाहन केले. सुट्टीचा हंगाम मंदिरात गर्दी आणत असल्याने, या आवाहनाने सर्वांसाठी अधिक आदरणीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या योग्य वातावरण निर्माण करण्यास मदत होईल असे अधिकाऱ्यांना वाटते.
मंदिरातील भाविकांसाठी घातलेले निर्बंध आणि गणवेश यांवरुन अनेकांमध्ये मतभेद आहेत. अनेक लोक या निर्बंधांचे स्वागत करतात. तर, काही लोक त्याला तीव्र विरोध करतात. काही मंदिरांनी मंदिरात जाण्यासाठी आगोदरच ड्रेसकोड लागू केला आहे. दुसऱ्या बाजूला असे निर्बंध लादने म्हणजे प्रथा, परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे आहे. त्यामुळे आता बांकेबिहारी मंदिर प्रशासनाने केलेल्या अवाहनास नागरिक आणि भाविकांकडून कसा प्रतिसाद येतो याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, विशिष्ट प्रकारे कपडे घातल्यानंतरच पावित्र्य जपता येते का? असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यामध्ये डावे विचारवंत, पुरोगामी संघटना आणि विवेकबुद्धीने विचार करणाऱ्या नागरिकांचाही समावेश आहे.