Underground House: यूपीच्या हरदोईमध्ये व्यक्तीने 12 वर्षांत बांधले दोन मजली भूमिगत घर; जमिनीखाली तयार केल्या 11 खोल्या, मशीद आणि गॅलरी (Watch Video)
या घराला दोन दरवाजे बांधले आहेत. एका गेटमधून प्रवेश आणि दुसऱ्या गेटमधून बाहेर पडण्याची सोय आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हरदोई (Hardoi) जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या व्यक्तीने जमिनीखाली चक्क दोन मजली इमारत बांधली आहे. ही वास्तू जमिनीत खोदून बांधण्यात आली असल्याने त्यासाठी विटा किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. या इमारतीत 11 खोल्या असून एक मशीद, गॅलरी आणि बसण्यासाठी लिव्हिंग रूमदेखील बांधण्यात आली आहे. ही इमारत पूर्ण होण्यासाठी 12 वर्षे लागली. या इमारतीत आणखी सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. हरदोईच्या शाहबाद शहरातील मोहल्ला खेडा बिबिजाई येथे राहणारा इरफान उर्फ पप्पू बाबा याने हा जमिनीखालील महाल उभा केला आहे.
इरफान सांगतो की त्याने 2011 साली हे जमिनीखालील घर बांधायला सुरुवात केली, तेव्हापासून तो हे घर बांधण्यात गुंतला आहे. या घराला दोन दरवाजे बांधले आहेत. एका गेटमधून प्रवेश आणि दुसऱ्या गेटमधून बाहेर पडण्याची सोय आहे. प्रवेशद्वारावर मातीच्या पायऱ्या करून 20 फूट खोलीवर मशिदीचा आराखडा तयार करण्यात आला. जिथे इरफान नमाज अदा करतो.
इरफानचे म्हणणे आहे की, त्याने ही इमारत फक्त कुदळ आणि फावडे वापरून बांधली आहे. वृत्तसंस्था एएनआयने या घराचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इरफानचे काम पाहण्यासाठी लोक तेथे पोहोचू लागले. (हेही वाचा: Google Flights वापरुन स्वस्तात मिळवा फ्लाईट तिकीट, घ्या जाणून)
इरफानचे म्हणणे आहे की, 2010 पर्यंत तो एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगत होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्याने त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्याला विजय मिळाला नाही. यानंतर तो लोकांपासून दूर जाऊ लागला. पुढे 2011 मध्ये त्याने वैराग्याचे जीवन स्वीकारले आणि मानवी वसाहतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. काहीतरी वेगळे करायचे म्हणून त्याने स्वतःच्या जमिनीखाली हे दोन मजली घर बांधण्यास सुरुवात केली. इरफानने लग्न केले नाही. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य गावातील घरात राहतात.