Uttar Pradesh: दलित व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून भावांनी गोळी झाडून केली बहिणीची हत्या; शेतात गाढला मृतदेह
कुटुंबियांच्या विरोधात जावून दलित व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून भावांनी बहिणीला संपवले. उत्तर प्रदेश मधील मैनपूरी जिल्ह्यातील पैतृक गावात ही घटना घडली.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये एका 23 वर्षीय महिलेची तीन भावांनी गोळी झाडून हत्या केली आहे. कुटुंबियांच्या विरोधात जावून दलित व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून भावांनी बहिणीला संपवले. उत्तर प्रदेश मधील मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील पैतृक गावात ही घटना घडली. भावांनी दिल्लीहून बहिणीला बोलावून घेतले आणि त्यानंतर तिची हत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, चांदनी कश्यप असे या मृत महिलेचे नाव आहे. हत्या केल्यानंतर भावांनी बहिणीचा मृतदेह शेतात गाढला.
12 जून रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील 25 वर्षीय अर्जुन कुमार याच्याशी चांदनी हिने विवाह केला. दोघेही 8 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अर्जुन दिल्लीच्या त्रिलोकपुरी परिसरात राहत होता. लग्नानंतर चांदनीच्या भावांनी तिच्याशी बोलणे सुरु केले. त्यानंतर एक दिवस मैनपुरी मधील पैतृक निवास येथे येण्यास तिला तयार केले. (Honour Killing: आंतरजातीय प्रेमसंबंधांतून पोटच्या मुलीची हत्या करून मृतदेह पुरला शेतात; वडिलांसह दोन चुलत भावांना अटक)
20 नोव्हेंबर रोजी तिचे तिच्या पतीशी शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर तिच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाली नसल्याचे पतीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 10 तास तपास करत 11 डिसेंबर रोजी महिलेचा मृतदेह शेतातून काढला.
चांदनीचे भाऊ 17 नोव्हेंबर रोजी तिला घेऊन गेले. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी तिने अर्जुनशी फोनवर संवाद साधला. त्यावेळेस कुटुंबियांनी तिला मारहाण केल्याचे आणि तिने सासरी परतू नये अशी त्यांची इच्छा असल्याचे तिने सांगितले. संवादादरम्यान अचानक फोन कट झाला आणि नंतर फोन बंद होता. त्यामुळे 22 नोव्हेंबर रोजी अर्जुनने चांदनीच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, तेथे जाण्यापूर्वी त्याने मयूर विहार पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. अर्जुन आपल्या आई आणि काकांसोबत मैनपुरी येथे पोहताच त्यांनी चांदनी आदल्या दिवशीच दिल्लीला गेली असल्याचे सांगितले.
अर्जुनने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदनीच्या 3 भावांविरुद्ध FIR दाखल करत तपास सुरु केला. तब्बल 10 तास तपास करत 11 डिसेंबर रोजी महिलेचा मृतदेह शेतात सापडला. चौकशी दरम्यान पीडितेचा भाऊ सुनील कश्यप याने गुन्हाची कबूल दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप तिचे दोन भाऊ फरार आहेत.