Uttar Pradesh: धक्कादायक! घटस्फोट घेण्यासाठी त्याने गर्भवती पत्नीला दिले HIV चे इंजेक्शन; कुटुंबातील इतरांनीही दिली साथ, गुन्हा दाखल
ही गोष्ट मुलीने माहेरी सांगितल्यावर, माहेरचे लोक जाब विचारण्यासाठी तिच्या सासरी आले. त्यावेळी छोटा वादही झाला आणि त्यामध्ये सासरच्या मंडळींनी स्पष्ट सांगितले की, आम्ही मुलीला नांदवू शकत नाही तिला परत घेऊन जा
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगडमध्ये (Aligarh) रविवारी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे, पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी पतीने गर्भवती पत्नीला इंजेक्शन देऊन एचआयव्ही (HIV) संक्रमित केले. या संदर्भात, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे लोढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामघाट रोडवरील एका नर्सिंग होममध्ये हा कट रचला गेला होता. या नर्सिंग होमचे संचालक हे या महिलेच्या सासरच्या मंडळींचे नातेवाईक आहेत. आता हे संचालकही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
न्यूज 18 हिंदी यांनी याबाबत वृत्त दिले आहे. 7 डिसेंबर 2020 रोजी मुलीचा विवाह शहरातील रामघाट रोड परिसरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी तरुणाशी झाला होता. पीडित मुलीचा आरोप आहे की, लग्नात 12 लाख रोख आणि 25 लाख रुपये अन्य प्रकारे असा हुंडा घेण्यात आला. लग्नानंतर मुलीला समजले की, आपल्या पतीचे सोबत काम करणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याशी संबंध आहेत. यामुळे काही दिवसांनी दोघांमध्ये वाद सुरु झाला. मात्र त्यावेळी पतीने माफी मागून ती वेळ टाळून नेली.
पुढे या मुलीच्या मोठ्या दिराने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मुलीने माहेरी सांगितल्यावर, माहेरचे लोक जाब विचारण्यासाठी तिच्या सासरी आले. त्यावेळी छोटा वादही झाला आणि त्यामध्ये सासरच्या मंडळींनी स्पष्ट सांगितले की, आम्ही मुलीला नांदवू शकत नाही तिला परत घेऊन जा. याचे कारण विचारले असता, आपल्याला ही मुलगी पसंत नसल्याचे तिच्या पतीने सांगितले. त्यावेळी कसेतरी हे प्रकरण मिटले मात्र सासरची मंडळी घटस्फोटाचे नियोजन करू लागली.
यावेळी त्यांनी मुलगी सतत आजारी असल्याचे कारण सांगितले. यावर माहेच्या मंडळींनी सांगितले की, यापूर्वी कधीही कोणताही आजार नव्हता. आता ती गरोदर आहेत त्यामुळे थोडा त्रास होणे सामान्य आहे. यानंतर, 4 ऑगस्ट रोजी पतीने या गर्भवती महिलेला गावाबाहेर तिच्या मामाच्या घरी सोडले. त्यावेळी मुलीने सांगितले की ती गर्भवती झाल्यानंतर काही दिवसांनी तिचा पती आणि मेहुणा तिला एचआयव्ही संक्रमित करण्याचा कट रचू लागले. मुलीच्या म्हणण्यानुसार, पतीच्या मेहुण्याच्या कुटुंबाचे रामघाट रोडवर एक नर्सिंग होम आहे, जिथे उपचाराच्या नावाखाली तिला इंजेक्शन्स देण्यात आली. (हेही वाचा: तापट पत्नीच्या मानसिक अत्याचारामुळे पतीचे 21 किलो वजन झाले कमी; उच्च न्यायालयाची घटस्फोटाला मंजुरी)
यामुळेच तिला एचआयव्हीची लागण झाली आहे. पती, दीर, सासू, सासरे, जाऊ, नणंद, नणंदेचा नवरा अशा सर्वांनी हा कट रचल्याचा आरोप आहे. आता पोलिसांनी खुनाचा कट, प्राणघातक हल्ला, विनयभंग, हुंडा कायदा आणि हेतुपुरस्सर रोग पसरवण्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.