Uttar Pradesh: कोरोना विषाणू संक्रमित महिलेची आत्महत्या; 'करवा चौथ' उपवासास विरोध केल्याच्या रागातून कृत्य

या ठिकाणी दाखल केलेल्या एका कोरोना संक्रमित (Coronavirus) महिलेने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली आहे

Representational Image (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या इटावा (Etawah) जिल्ह्यातील सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (Saifai Medical University) कोविड रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या एका कोरोना संक्रमित (Coronavirus) महिलेने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली आहे. या महिलेच्या आत्महत्येमागील प्रमुख कारण हे तिला काल 'करवा चौथ'चा उपवास करू न देणे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

आत्महत्या करणार्‍या महिलेला ब्रेन ट्यूमरने ग्रासले होते, तिच्यावर मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये उपचार सुरू होते. तपासणीनंतर तिची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने तिच्यावर कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. आयसोलेशन वॉर्ड क्रमांक 5 मध्ये दाखल कोरोना बाधित महिला मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी होती. ती न्यूरो-आजाराने ग्रस्त होती. 26, 27 ऑक्टोबर रोजी तिला महिला न्यूरो-सर्जरी विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 29 ऑक्टोबर रोजी तिचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने तिला कोविड-19 रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. या वॉर्डमध्ये तिच्यासोबत अजून एका महिलेवर उपचार सुरु होते. (हेही वाचा: कोरोना व्हायरसने मध्यम वर्गीय लोकांना केले कर्जबाजारी; घर चालवण्यासाठी 4 पैकी एका व्यक्तीने घेतले Loan, मुंबई व भोपाळ आघाडीवर)

ही घटना घडली त्यावेळी दोन कर्मचारी ड्यूटीवर होते. महिलेच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंब रुग्णालयात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी एसडीएम हेमसिंह, स्टेशन प्रभारी सतीश यादव हेही रुग्णालयात पोहोचले. कुटुंबियांशी बोलल्यानंतर आता ते महिलेच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. दरम्यान, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीत आत्महत्येची ही पहिली घटना नाही. याआधीही खिडकीतून उडी मारुन रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 2016 मध्ये एका कैद्याने खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. 2017 मध्ये ओपीडीच्या चौथ्या मजल्यावर दाखल झालेल्या टीबी रूग्णाने उडी मारून जीव दिला होता.