कौतुकास्पद! उत्तर प्रदेश मधील 10 वर्षांचा मुलाने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

एका 10 वर्षांच्या मुलाने उत्तर प्रदेश बोर्डाची (Uttar Pradesh Board) परीक्षा पार केली आहे. परीक्षेत त्याला 79 टक्के गुण मिळाले आहेत.

Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून एक आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. एका 10 वर्षांच्या मुलाने उत्तर प्रदेश बोर्डाची (Uttar Pradesh Board) परीक्षा पार केली आहे. परीक्षेत त्याला 79 टक्के गुण मिळाले आहेत. आदित्य श्रीकृष्ण असे या मुलाचे नाव असून त्याला दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी विशेष अनुमती देण्यात आली होती. आदित्यला हिंदीमध्ये 82, गणितात 64, विज्ञानात 76, सामाजिक विज्ञानात 84 आणि कला विषयात 86 असे गुण प्राप्त झाले आहेत. यंदा 17 ऑक्टोबर रोजी आदित्य 11 वर्षांचा होईल.

शाळांचे जिल्हा निरीक्षक मुकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, आदित्य एक असामान्य आणि अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. आपल्या वयाच्या नाही तर मोठ्या वयाच्या मुलांसाठी देखील तो अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याच्या असाधारण बुद्धिमत्तेच्या जोरावर युपी माध्यमिक शिक्षा बोर्ड (यूपीएसईबी) ने 2019 मध्ये त्याला विशेष अनुमती दिल्यानंतर लखनऊच्या एमडी शुक्ला इंटर कॉलेजमध्ये 9 वीत प्रवेश मिळाला. (कौतुकास्पद! हैद्राबादमधील अडीच वर्षाच्या Aadith Gourishetty ने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर नोंदवले 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' नाव; आणखी 4 पुरस्कारावरही उमटवली मोहोर)

आदित्यबद्दल बोलताना मुख्याध्यापक एचएन उपाध्याय म्हणाले की, आदित्य एक उत्साही विद्यार्थी आहे. कोणतीही गोष्ट त्याला अगदी पटकन कळते. अनेक विषय तो अगदी सहज समजू शकतो. योगाबद्दल त्याला चांगली माहिती आहे. तसंच अनेक सामाजिक मुद्द्यांवरही तो दीर्घकाळ चर्चा करतो. आदित्य म्हणजे आमच्या शाळेची संपत्ती आहे, अशा शब्दांत मुख्याध्यापकांनी त्याचे कौतुक केले.

युपीएसईबीने तुलनेने वयाने लहान विद्यार्थ्याला 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बसण्यास अनुमती देण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सुषमा वर्मा या 5 वर्षांच्या मुलीला 9 वी इयत्तेत बसण्याची परवानगी देण्यात आली होती. 2007 मध्ये युपी बोर्डाची परीक्षा पास करुन तिने नवा विक्रम रचला. ती दहावीची परीक्षा पास करणारी देशातील सर्वात लहान वयाची विद्यार्थी ठरली आहे. दरम्यान, बोर्डाच्या नियमानुसार 10 वी च्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 14 असणे गरजेचे आहे.