Use of Banned Oxytocin Delhi Dairies: सावध रहा! आता घरी येणारे दूधही नाही सुरक्षित; दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात धक्कादायक खुलासा
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली सरकारच्या औषध नियंत्रण विभागाला साप्ताहिक तपासणी करून गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे.
Use of Banned Oxytocin Delhi Dairies: सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत दूध (Milk) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र तुम्ही पीत असलेले दूध किती सुरक्षित आहे हे तुम्हाला माहीत आहे का? सध्या हा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण या दुधाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात एक अहवाल दाखल करण्यात आला आहे. या अहवालात दिल्लीत पुरवल्या जाणाऱ्या दुधात ऑक्सिटोसिनचा (Oxytocin) वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या औषधावर 2018 मध्ये केंद्र सरकारने बंदी घातली होती. आता प्राण्यांपासून दुग्धोत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने ऑक्सिटोसिनचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
जनावरांच्या दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी या औषधाचा दुरुपयोग केला जात असून, त्यामुळे जनावरांच्या तसेच दूध पिणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानीत गाई आणि म्हशींचे पालनपोषण करणाऱ्या डेअरीमध्ये ऑक्सिटोसिनच्या गैरवापरावर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोर्टाने म्हटले आहे की, प्राण्यांना हार्मोनशी संबंधित औषधे देणे हा प्राणी क्रूरता आणि गुन्हा आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली सरकारच्या औषध नियंत्रण विभागाला साप्ताहिक तपासणी करून गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. आता याचा तपास पोलीस करणार आहेत. कोर्टाने दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला ऑक्सीटोसिनचे उत्पादन, पॅकेजिंग आणि वितरणाचे स्रोत ओळखण्यास सांगितले आहे. शिवाय याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्यासही सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय राजधानीतील दुग्धव्यवसायांच्या दुरवस्थेशी संबंधित सुनीना सिब्बल आणि इतरांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले की, प्राण्यांना ऑक्सिटॉसिन देणे हे प्राण्यांवर क्रूरतेचे प्रमाण असल्याने, तो दखलपात्र गुन्हा आहे. परिणामी, न्यायालयाने औषध नियंत्रण विभाग, जीएनसीटीडीला निर्देश दिले आहेत की, नकली ऑक्सिटोसिनच्या वापराची किंवा ताब्यात ठेवण्याची सर्व प्रकरणे प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या कलम 12 आणि औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 18 (ए) अंतर्गत नोंदणीकृत केली जावीत. (हेही वाचा: Bharat Biotech on Covaxin's Side Effects: 'कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित, कोणतेही दुष्परिणाम नाहीत', भारत बायोटेकचे निवेदन)
दरम्यान, सध्या संपूर्ण देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केवळ एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल् लिमिटेड (KAPL) लाच ऑक्सीटोसिन तयार करण्याची परवानगी आहे. दुधामध्ये ऑक्सीटोसिनचा वापर ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याबाबत आपण जागरूक असणे आवश्यक आहे. दूध खरेदी करताना सावधगिरी बाळगा आणि विश्वासार्ह स्त्रोतांकडूनच दूध खरेदी करा.