Suhas Kande Challenges Uddhav Thackeray: मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा; आमदार सुहास कांदे यांचा दावा

या सभांमधून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

Uddhav Thackeray (PC - PTI)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी काल (26 मार्च) नाशिकच्या मालेगाव मध्ये सभा घेत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना देखील लक्ष्य केले. कोण म्हणतं कांद्याला भाव नाही. नाशकातील आमदारांनी खोके घेतले आहेत. 50 खोक्यामध्ये त्यांचा व्यवहार झाल्याचं सांगत टीकेचे बाण सोडले. पण यावरून सुहास कांदे यांनी देखील लागलीच प्रत्युत्तर देत एक मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जनतेसाठी नव्हे तर मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना वाचवण्यासाठी दिला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.या दाव्यासोबतच त्यांनी आपली आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा म्हणजे सारंच स्पष्ट होईल असं आव्हानही दिलं आहे.

काय आहे सुहास कांदे यांचा दावा?

“खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. ज्या काँट्रॅक्टरांची नावं समोर येतील त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि उद्धव ठाकरे यांची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. त्यांना वाचवण्यासाठी किती लोकांची मध्यस्थी केली यासाठीचा राजीनामा देण्यापूर्वीच्या प्रसंगांचा मी स्वतः साक्षीदार आहे. या कॉन्ट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा”असा खळबळजनक दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

श्रीधर पाटणकर यांच्यावर अटकेची तलवार होती. त्यांच्या अटकेतून चौकशी झाली असती. मग संशयाची सुई कोणाकडे जाईल याची भीती उद्धव ठाकरे यांना होती त्यामुळे श्रीधर पाटणकरांना वाचवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचं सुहास कांदे यांचं म्हणणं आहे.

नार्को टेस्टची मागणी

ऑन कॅमेरा आम्हा दोघांचीही नार्को टेस्ट करा. जर ते म्हणाले मी "पाटणकरांसाठी राजीनामा दिलेला नाही, तर मी राजकारणातून संन्यास घेईन." असेही कांदे म्हणाले आहेत. 'आम्ही खोके सोडा एका रूपयालाही हात लावलेला नसल्याचं' ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Uddhav Thackeray Warns Rahul Gandhi: 'वीर सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा.

उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्याच्या सुरूवातीला खेड तर आता महिन्याच्या अखेरीस मालेगाव मध्ये सभा घेतली आहे. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. सुहास कांदे हे नाशिकच्या नांदगाव  विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदे गटासोबत गेले.