Shocking! 8 महिन्यांचा बाळाला मारले-झोडपले, जमिनीवर आपटले; केअरटेकरचे धक्कादायक कृत्य, मुलाचे ब्रेन हॅमरेज
कोमलने मुलाला चापट मारल्यानंतर त्याचे कान टोचले आणि बोटे छाटण्यात आली. यानंतर त्याला पाच ते सात वेळा मारहाण करण्यात आली
तुम्ही जर का मुलांना केअरटेकरच्या (Caretaker) भरवश्यावर सोडून कामावर जात असाल तर ही बातमी नक्कीच वाचा. गुजरातमधील सुरतमधून (Surat) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला केअरटेकरने 8 महिन्यांच्या निष्पाप मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याला जमिनीवर आपटले. यामुळे मुलाचा ब्रेन हॅमरेज झाला. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहून कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात आला. आता मुलाला मारहाण केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.
मुलाचे वडील मितेश पटेल यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रांदेर पोलीस ठाण्यात केअरटेकर कोमलच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेला आयपीसीच्या कलम 307 आणि 323 अंतर्गत खुनाचा प्रयत्न आणि हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केली. आरोपी कोमलची स्वतःची मुले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचा नवरा शाळेत काम करतो. कोमलला मुले नसल्यामुळे त्यांच्या घरात नेहमी तणाव निर्माण होत होता. या गोष्टीचा राग कोमलने या मुलावर काढला. तिने त्याला मारले, झोडपले.
मितेश आणि पत्नी हे दाम्पत्य सुरत शहरात आपल्या जुळ्या मुलांसोबत राहते. पती-पत्नी काम करतात, त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी कोमलला केअरटेकर म्हणून काम दिले. मितेश आणि त्याच्या पत्नीने सांगितले की, ते कामावर गेल्यानंतर लहान मुलांच्या रडण्याचा मोठा आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजमुळे कोमलचे कृत्य समोर आले.
दाम्पत्याला सीसीटीव्हीमध्ये दिसले की, कोमल मुलाला मांडीवर बसून मुलाला बेदम मारहाण करत आहे. कोमलने मुलाला चापट मारल्यानंतर त्याचे कान टोचले आणि बोटे छाटण्यात आली. यानंतर त्याला पाच ते सात वेळा मारहाण करण्यात आली. केअरटेकर कधी मुलाला बेडवर तर कधी हवेत फेकत होती. जवळजवळ दीड तास हे कृत्य चालले. (हेही वाचा: 99 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार; 48 वर्षीय केअरटेकरचे विकृत कृत्य, सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
शुक्रवारी हे मूल बेशुद्ध पडल्यावर केअरटेकरने याची माहिती दिली व त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल केले गेले. बाळाचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे रुग्णालयातून कुटुंबीयांना समजले. मुलाचे सीटी स्कॅन केले असता त्याच्या मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. 7 फेब्रुवारीच्या एमआरआय अहवालातही त्याच्या मेंदूच्या पटीत जखमा असल्याचे दिसून आले.