Sanatan Dharma Row: अयोध्येमधील संतांची उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडून बिनशर्त माफीची मागणी, नाहीतर तामिळनाडूपर्यंत मोर्चा काढण्याची धमकी
अयोध्या येथे आयोजित धर्मसंसदेत संतांनी हिंदू धर्मावरील शाब्दिक हल्ल्यांचा निषेध केला आणि सांगितले की देशातील काही राजकीय पक्ष द्वेष पसरवत आहेत.
तामिळनाडूचे (Tamil Nadu) मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Minister Udaynidhi Stalin) यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्याबाबतचा वाद अजूनही सुरु आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर संतापलेल्या अयोध्येतील संतांनी बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास स्टॅलिन यांच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने तामिळनाडूकडे मोर्चा काढण्याची धमकी दिली आहे.
अयोध्या येथे आयोजित धर्मसंसदेत संतांनी हिंदू धर्मावरील शाब्दिक हल्ल्यांचा निषेध केला आणि सांगितले की देशातील काही राजकीय पक्ष द्वेष पसरवत आहेत.
या संसदेच्या अध्यक्षस्थानी असलेले हनुमान गढीच्या निर्वाणी आखाड्याचे महंत मुरली दास म्हणाले की, कायदा आणि संविधानाच्या नावाखाली शपथ घेणारे राजकारणी सनातन धर्माच्या अपमानावर मौन बाळगून आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य हे समाजात फूट निर्माण करण्याचा डाव असून सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेणे आवश्यक आहे. अशा लोकांना देशात हिंसाचार भडकवायचा आहे.
संकट मोचन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, महंत संजय दास यांनी स्टॅलिन यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आणि तसे न झाल्यास त्यांनी संतांना तामिळनाडूकडे मोर्चा घेऊन जाण्याचे आवाहन केले. माफी माण्यासाठी उदयनिधी यांना एका आठवड्याचा अवधी देत महंत संजय म्हणाले की, सनातन धर्माविरुद्ध अपमानास्पद वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. (हेही वाचा: जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हा श्रद्धा आणि धर्म अशा गोष्टींमुळे प्रभावित होऊ शकत नाही; Delhi High Court ची टिप्पणी)
महंत परमहंस आचार्य म्हणाले की, घटनात्मक पदावर बसलेले लोक समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. सनातन धर्मावर श्रद्धा असणारे लोक उदयनिधी स्टॅलिनसारख्या लोकांना चोख प्रत्युत्तर देतील. याआधी परमहंस आचार्य यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवरून उदयनिधी यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. तसेच परमहंस आचार्य म्हणाले होते की, जो कोणी उदयनिधीचे शीर आणेल त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.