रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई; 43 लाख रुपयांची तिकिटे केली जप्त, 6 जणांना अटक

सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना 43,42,750/- रुपयांची 1688 ज्यावर प्रवास सुरू करता आला नाही , ती जप्त करण्यात आली.

Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

1.3 अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला सेवा पुरवणाऱ्या  भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने क्षमता वाढवूनही मागणी-पुरवठ्यातील तफावत  वाढली आहे. मागणी-पुरवठ्यातील या तफावतीमुळे अनेक दलाल सक्रिय झाले असून ते विविध  मार्गांचा वापर करून तिकिटे आरक्षित करतात आणि नंतर ती गरजूंना चढ्या दराने विकतात.  रेल्वे तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण करण्यासाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर केला जात असून  सर्वसामान्यांसाठी  आरक्षित  तिकिटांच्या उपलब्धतेवर विपरित परिणाम झाला आहे. रेल्वे तिकिटांची अवैध खरेदी आणि विक्री  करणाऱ्या दलालांविरोधात  रेल्वे सुरक्षा दल “ऑपरेशन उपलब्ध” या सांकेतिक नावाखाली सातत्याने कठोर  कारवाई करत आहे.

अलीकडेच गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाला   8.5.2022 रोजी राजकोटच्या मन्नन वाघेला (ट्रॅव्हल एजंट) याला पकडण्यात यश आले. तो COVID-19 या  बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर करून मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकीटे आरक्षित करत होता.  त्यानंतर  वाघेला याने  दिलेल्या माहितीच्या आधारे कन्हैया गिरी ( COVID-X, ANMSBACK, BLACK TIGER इ. अवैध  सॉफ्टवेअर्सचा विक्रेता ) नावाच्या व्यक्तीला 17.07.2022 रोजी मुंबईतून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, गिरीने सत्य परिस्थिती सांगत यातले  इतर सहयोगी आणि वापी इथला ऍडमिन /डेव्हलपर अभिषेक शर्मा यांची नावे उघड केली. त्यांना 20.07.2022 रोजी अटक करण्यात आली होती. अभिषेक शर्माने या सर्व बेकायदेशीर सॉफ्टवेअर्सचा ऍडमिन असल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, अमन कुमार शर्मा, वीरेंद्र गुप्ता आणि अभिषेक तिवारी या 3 आरोपींना अनुक्रमे मुंबई, वलसाड (गुजरात) आणि सुलतानपूर (यूपी) येथून अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल  या प्रकरणी  आणखी काही संशयितांचा शोध घेत आहे.

हे आरोपी सोशल मीडिया म्हणजे टेलिग्राम, व्हॉट्सॲपचा वापर करून अशा  बेकायदेशीर सॉफ्टवेअरच्या विकासात आणि विक्रीत सहभागी  होते. तसेच आयआरसीटीसीचे बनावट व्हर्च्युअल नंबर आणि बनावट वापरकर्ता आयडी पुरवत  होते. या आरोपींकडे बनावट आयपी ॲड्रेस तयार करण्याचे सॉफ्टवेअर होते ज्याचा वापर ग्राहकांना प्रत्येक आयपी ॲड्रेसमागे   मर्यादित तिकीटे  मिळविण्यावरचे  निर्बंध लागू होऊ नयेत यासाठी  केला जात होता . त्यांनी डिस्पोजेबल मोबाइल नंबर आणि डिस्पोजेबल ईमेल देखील विकले जे आयआरसीटीसीचे बनावट युझर आयडी तयार करण्यासाठी ओटीपी  पडताळणीसाठी वापरले जात होते.

या प्रकरणी या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना 43,42,750/- रुपयांची 1688 ज्यावर  प्रवास सुरू करता आला नाही , ती जप्त करण्यात आली.  यापूर्वीही , त्यांनी 28.14 कोटी रुपयांची तिकिटे खरेदी केली आणि ती  विकून मोठ्या प्रमाणावर  कमिशन मिळवले होते. यावरून हे दिसून येते की किती प्रमाणात काळा पैसे येतो ज्याचा वापर  इतर अवैध कारवायांसाठी देखील केला जाऊ शकतो.

आरोपींनी उघड केलेली माहिती एका  पथकाद्वारे तपासली जात आहे, ज्याद्वारे त्रुटी दूर करून  अशा प्रकारची फसवणूक थांबवता येईल. यापुढेही ही कारवाई सुरु राहील.