IPL Auction 2025 Live

Road Accident: खराब रस्त्यामुळे झालेल्या भीषण अपघातासाठी अधिकारी जबाबदार असतील: Highway Authority of India

महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कंपन्यांना योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातामध्ये (Road Accident) मृत्युमुखी पडतात. हे अपघात टाळण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे मात्र त्याला अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसत आहे. आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे की, खराब रस्ते किंवा अभियांत्रिकी कामांमुळे होणार्‍या कोणत्याही प्राणघातक किंवा गंभीर अपघातांसाठी ते अधिकार्‍यांना जबाबदार धरतील.

NHAI ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, प्राधिकरणाने तात्पुरते प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेत सामील असलेल्या NHAI च्या प्रतिनिधींच्या कर्तव्यात दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीची गंभीर दखल घेतली आहे. प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. परिपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘रोड मार्किंग, रोड साइनेज, पंच लिस्टमधील क्रॅश बॅरिअरचे पूर्णत्व यांसारखी सुरक्षा कार्ये लक्षात घेऊन तात्पुरती पूर्णता प्रमाणपत्रे जारी केली जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे केवळ वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होत नाही, तर अपघात/मृत्यूच्या बाबतीत NHAI चे नाव देखील खराब होत आहे.’

प्रलंबित कामे एका वर्गवारीत ठेवली जातात, ज्याला पंच लिस्ट म्हणतात. केवळ रस्ते सुरक्षेशी संबंधित नसलेल्या कामांचाच पंच यादीत समावेश करून या यादीतील कामे 30 दिवसांत पूर्ण करावीत, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. आता NHAI ने म्हटले आहे की, ‘तात्पुरती पूर्णता प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी सर्व रस्ते सुरक्षेशी संबंधित कामे पूर्ण झाली आहेत याची खात्री केली पाहिजे. निकृष्ट रस्ते व अभियांत्रिकी कामांमुळे झालेल्या कोणत्याही जीवघेण्या अपघातास प्रादेशिक अधिकारी किंवा प्रकल्प संचालक किंवा स्वतंत्र अभियंता जबाबदार असतील. (हेही वाचा: केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; मदतकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल)

अलीकडेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही रस्ते अपघातांसाठी दोषपूर्ण/अपूर्ण प्रकल्प अहवालांना जबाबदार धरले. महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कंपन्यांना योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दरम्यान, भारतातील रस्ते अपघातांच्या आकडेवारीबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये संपूर्ण भारतभर रस्ते अपघातात 1.55 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. यानुसार सरासरी एका दिवसात 426 लोक, तर दर तासाला 18 जणांना रस्ते अपघातामध्ये जीव गमवावा लागला. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.