Rajasthan Shocker: कोटामध्ये रील बनवण्याची क्रेझ ठरली जीवघेणी; बंदुकीसह व्हिडिओ शूट करताना तरुणाचा मृत्यू

यशवंत असे मृताचे नाव असून, तो कोटा येथे पदवीचे शिक्षण घेत होता. या तरुणासोबत त्याचे काही मित्रही घटनास्थळी उपस्थित होते. प्रत्येकजण सोशल मीडियासाठी रील बनवत होता. त्यांच्याकडेही बंदूक होती.

gun shot representative image PC Pixa

सध्या सोशल मिडियाच्या वाढत्या क्रेझमध्ये रील (Reels) बनवणे ही अतिशय कॉमन गोष्ट झाली आहे. रील्स बनवताना अनेक अपघात झाल्याचेही समोर आले आहे. आता राजस्थानच्या (Rajasthan) कोटा (Kota) शहरातील महावीर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीने रील बनवत असताना अचानक गोळी लागून, एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोटा शहर पोलीस उपअधीक्षक मनीष शर्मा आणि महावीर नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी महेंद्र मारू यांच्यासह इतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून तपासही सुरू करण्यात आला आहे.

याबाबत डीएसपी मनीष शर्मा म्हणतात की, गोळी लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यशवंत असे मृताचे नाव असून, तो कोटा येथे पदवीचे शिक्षण घेत होता. या तरुणासोबत त्याचे काही मित्रही घटनास्थळी उपस्थित होते. प्रत्येकजण सोशल मीडियासाठी रील बनवत होता. त्यांच्याकडेही बंदूक होती. अशात अचानक एका तरुणाकडून व्हिडिओ बनवत असताना चुकून ट्रिगर दाबला गेला. यावेळी गोळीबार झाला आणि गोळी यशवंतला लागली.

गोळी लागल्यानंतर तरुणाला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवागारात हलवण्यात आला आहे. डीएसपी म्हणाले की, घटना दुपारी 3 वाजताची आहे. घटोत्कच सर्कलजवळील महर्षी गौतम कम्युनिटी हॉलजवळ ही घटना घडली. 20 वर्षीय यशवंत मूळचा झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस स्टेशनचा रहिवासी असून कोटा येथे मित्रांसोबत राहत होता. (हेही वाचा: Andhra Pradesh: विजयवाडा येथे डॉक्टरांसह कुटुंबातील 5 जण मृतावस्थेत आढळले; 4 जणांच्या शरीरावर जखमांच्या खुणा)

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मृताच्या कुटुंबीयांना दिली आहे. हो गोळी कोणी झाडली, या मुलांकडे बंदुकीसारखी शस्त्रे कोठून आली याचाही तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशाच्या बंदरा जिल्ह्यात एक युवक रील बनवण्यासाठी शाळेच्या छतावर उलटा लटकून व्यायाम करत होता. त्याच्या एका मित्राने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला मात्र, त्याचवेळी छतावरचा स्लॅब खाली कोसळला. स्लॅब कोसळल्याने या मुलगा थेट डोक्यावर पडला. यावेळी डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.