Rajasthan Shocker: राजस्थानमध्ये अल्पवयीन बहिणींवर सामुहिक बलात्कार; दोघी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल

वडिलांनी विचारणा केली असता तिने तिच्या व तिच्या बहिणीसोबत घडलेल्या घटना सांगितल्या.

Rape Stope | Representational Image (Photo Credits: File Image)

राजस्थानमधील (Rajastan) अलवर (Alwar) जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्काराची (Gang Rape) घटना समोर आली आहे. अलवर जिल्ह्यातील एनईबी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. दोन्ही बहिणी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मोठ्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, गावातील एका फार्म हाऊसवर काम करणारे दोन तरुण तिच्यावर दीड वर्षांपासून सतत बलात्कार करत होते. तसेच कोणाला सांगू नकोस अशी धमकी द्यायची. एवढेच नाही तर पीडितेच्या लहान बहिणीवरही त्यांनी बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन प्रभारी आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अमित जैन यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबासह एनईबी पोलीस स्टेशन हद्दीतील एका फार्म हाऊसवर अनेक कुटुंबे काम करतात. पीडितेचे वडील गुरे सांभाळतात आणि दुधाचा व्यवसाय करतात. दोन्ही मुली शेळ्या चारण्याचे काम करतात. दोन्ही बहिणींचे वय 15 वर्षे आणि 11 वर्षे आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास आहे. या फार्म हाऊसमध्ये राहणारे दोन युवक शेत नांगरण्याचे काम करतात.

दोन्ही तरुणांनी आधी दीड वर्षे मोठ्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यानंतर, त्यांनी तिच्या 11 वर्षांच्या लहान बहिणीवरही बलात्कार केला. यामुळे ती देखील गरोदरही राहिली. मुलींनी यास विरोध केल्यावर आरोपी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प करायचे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी ते दूध देऊन घरी आले तेव्हा त्यांची मोठी मुलगी घरी झोपली होती. तिचे पोट दुखत होते. याबाबत त्यांनी मुलीला विचारले असता तिने काहीही सांगण्यास नकार दिला. (हेही वाचा: Madhya Pradesh Rape Case: निर्दयपणाचा कळस! सतना जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, 4 दिवसांत दुसऱ्यांदा घडली घटना)

संशयावरून वडिलांनी तिला जवळच्या गावातील नर्सकडे नेले, तेथे ती साडेसात महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. वडिलांनी विचारणा केली असता तिने तिच्या व तिच्या बहिणीसोबत घडलेल्या घटना सांगितल्या. यानंतर पीडितेने तिच्या वडिलांसह पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमित जैन यांनी सांगितले की, या प्रकरणी पॉक्सो कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बहिणींची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोपींचा शोध सुरू आहे.