Railway Accidents: गेल्या 8 महिन्यांत देशात 29 रेल्वे अपघात; 17 जणांचा मृत्यू, 71 जण जखमी, कारणांमध्ये उपकरणे बिघाड, तोडफोड यांचा समावेश
सुरक्षा वाढविण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठ महिन्यांत देशभरात 29 रेल्वे अपघात (Railway Accidents) झाले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैशवान यांनी सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली. ज्यामध्ये म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात 26 नोव्हेंबरपर्यंत उपकरणे निकामी होणे आणि तोडफोड यासह इतर कारणांमुळे एकूण 29 रेल्वे अपघात झाले आहेत. ज्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 71 जण जखमी झाले आहेत. संसदेचे वरचे सभागृह असलेल्या राज्यसभेत 29 नोव्हेंबर रोजी लेखी उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातांची माहिती दिली. द्रमुक खासदार कनिमोझी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी ही सर्व माहिती दिली. ज्यात त्यांनी गेल्या वर्षभरात मालगाड्यांसह रेल्वे अपघातांची संख्या आणि कारणे सांगितली.
\मंत्र्यांनी सांगितले की, रेल्वे अपघातांच्या कारणांमध्ये प्रामुख्याने उपकरणे निकामी होणे, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुका आणि जाणीवपूर्वक केलेली तोडफोड यांचा समावेश होतो. सुरक्षा वाढविण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी, ‘अशा अपघातांच्या कारणांचा तपास करण्यासाठी नेमलेल्या समित्यांची संख्या’, ‘चौकशी समित्यांचे निष्कर्ष आणि त्यावर केलेली कारवाई’ आणि ‘सरकारने पीडितांना दिलेली नुकसानभरपाईची रक्कम’, याबद्दलही माहिती विचारली होती.
रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेल्या विविध सुरक्षा उपायांमुळे अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे रेल्वे अपघात 2014-15 ते 2023-24 मध्ये 135 वरून कमी होऊन 40 वर आले. ते पुढे म्हणाले, 2004-14 दरम्यान एकूण 1,711 रेल्वे अपघात झाले, म्हणजे प्रतिवर्षी सरासरी 171, जे 2014-24 मध्ये 678 (प्रति वर्ष सरासरी 68) इतके कमी झाले. म्हणजेच यामध्ये 60 टक्के घट झाली आहे. (हेही वाचा: ATF Price Hike: विमानांची तिकिटे महागणार! तेल कंपन्यांनी 1.45 टक्क्यांनी वाढवल्या विमान इंधनाच्या किमती)
अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे अपघातांची चौकशी वैधानिक संस्था, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि विभागीय चौकशी समित्यांद्वारे केली जाते. तपासाच्या स्थितीचा तपशील देताना मंत्री म्हणाले, ‘एजन्सी, योग्य विचारविमर्शानंतर, विविध अपघातांमध्ये त्यांचे निष्कर्ष आणि शिफारसी सादर करतात.’ या अपघातांच्या तपासानंतर विविध सुरक्षेच्या उपायांची शिफारस केली जाते, जेणेकरून भविष्यात अपघात टाळता येतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच 2023-24 मध्ये सुरक्षा उपायांवर 1,01,651 कोटी रुपये खर्च करण्यात आले, जे मागील वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.