पंजाब मधील पोलीस अधिकारी हरजित सिंह यांचा कापलेला हात पुन्हा जोडला; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मानले डॉक्टरांचे आभार
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी याबाबात माहिती देत एका ट्विट मधून सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
पंजाब (Punjab) मध्ये लॉक डाऊन (Lock Down) काळात ऑन ड्युटी असणाऱ्या हरजीत सिंह (Harjeet Singh) या पोलीस अधिकाऱ्यावर निहंगा (Nihanga) समुदायातील काही अज्ञात तरुणांनी तलवारीने हल्ला करत त्यांचा हात कापला होता, हा कापलेला हात पुन्हा जोडण्यात आता डॉक्टरांना यश आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amrinder Singh) यांनी याबाबात माहिती देत एका ट्विट मधून सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पीजीआयएमईआर) रुग्णालयात त्यांच्यावर तात्काळ सर्जरी करण्यात आली आहे आणि साडेसात तासाच्या कठीण सर्जरीनंतर त्यांचा हात पुन्हा जोडण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निहंगा समुदायातील तरुणांनी हल्ला केला होता. लॉक डाऊन काळात भाजी मंडईत जाण्यासाठी पास मागितल्याने हल्ला करण्यात आला, यामध्येच हरजित सिंह यांचा हात कापला गेला. हा कापलेला हात घेऊन हरजित सिंह यांनी बाईकवरून रुग्णालय गाठले होते. तिथे त्यांच्यावर ही सर्जरी करण्यात आली.
पंजबाचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ट्विट करून याबाबत माहिती देत आनंद व्यक्त केला, "साडे सात तासांच्या प्रदीर्घ सर्जरीनंतर सहायय्क पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात जोडण्यात यश आलं आहे. मी डॉक्टरांची सर्व टीम आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो. प्रकृती लवकर सुधारण्यासाठी हरजीत सिंह यांना शुभेच्छा,” असं ट्विट अमरिंदर सिंह यांनी केलं आहे.
अमरिंदर सिंह ट्विट
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर हे तरुण पळून गेले होते, पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन यातील सात जणांना अटक केली आहे, सात पैकी पाच जण हे हल्ल्यात प्रत्यक्ष सामील होते, अटक करताना पोलीस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात अटक करण्यात आलेला एक आरोपी जखमी झाला आहे.