IPL Auction 2025 Live

Punjab: माजी मुख्यमंत्री Captain Amarinder Singh स्थापन करणार नवा पक्ष; BJP सोबत युतीची शक्यता

मात्र, वाद मिटला नाही व पुढे 18 सप्टेंबर रोजी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

Captain Amarinder Singh | (Photo Credits: Facebook)

पंजाबमध्ये (Punjab) सुरू असलेली ‘राजकीय दंगल’ संपण्याचे नावच घेत नाही. गेल्या महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) पासून वेगळे होण्याची औपचारिक घोषणा केली आहे. आता त्यांनी मंगळवारी नवीन राजकीय पक्ष (New Political Party) स्थापन करण्याची घोषणा केली. कॅप्टन अमरिंदर यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी नवीन पक्षाच्या घोषणेबद्दल ट्विट केले आहे. कॅप्टन अमरिंदर यांचा हवाला देत त्यांनी लिहिले आहे की, ‘पंजाबच्या भविष्याची लढाई सुरू आहे. मी लवकरच माझ्या राजकीय पक्षाची घोषणा करेन जो पंजाब, इथली जनता आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल.’

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपसोबत युतीकडेही लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला तर विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती होऊ शकते. कॅप्टन म्हणाले आहेत की, ‘जर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शेतकऱ्यांच्या हिताचा तोडगा निघाला तर, 2022 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत जागा वाटपाबाबत बैठका घेण्याची आशा करता येईल. यासोबतच, अकाली दलापासून विभक्त झालेल्या ढींढसा आणि ब्रह्मपुरा गटांसारख्या समविचारी पक्षांसोबतही युतीचा मार्ग शोधला जाऊ शकतो.’

ते पुढे म्हणाले, 'मी माझ्या लोकांचे आणि माझ्या राज्याचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत विश्रांती घेणार नाही. पंजाबला अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून राजकीय स्थिरतेची गरज आहे. मी माझ्या जनतेला वचन देतो की इथली शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जे काही लागेल ते मी करेन.’

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नाराजी असूनही काँग्रेस हायकमांडने 18 जुलै रोजी नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, वाद मिटला नाही व पुढे 18 सप्टेंबर रोजी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी म्हटले होते की, पक्षाने त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ती योग्य नव्हती. (हेही वाचा: प्रियंका गांधी यांचा मास्टरस्ट्रोक, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून महिलांना 40% उमेदवारी)

यानंतर, 20 सप्टेंबर रोजी चरणजित सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र चन्नी सरकारच्या काही निर्णयांमुळे संतप्त होऊन सिद्धू यांनीही राजीनामा दिला.