उत्तर प्रदेश मधील औरैया येथे झालेल्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना (View Tweets)
यादुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरी निघालेल्या एकूण 24 मजूरांवर काळाचा घाला झाला आहे. हे मजूर राजस्थानवरुन बिहार आणि झारखंड येथील आपल्या गावी जाण्यासाठी ट्रकमधून निघाले होते. शनिवार (16 मे) पहाटे 3:30 च्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात असून यात एकूण 24 मजूरांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून खेद व्यक्त केला आहे. (धक्कादायक! उत्तर प्रदेश च्या मिहौली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 23 मजूर ठार तर 15 जण गंभीर जखमी)
"उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेला अपघात अत्यंत दुःखद आहे. यासाठी सरकारचे मदतकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजूरांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विट करत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "मजूरांच्या मृत्यूची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजूरांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो," असे ट्विट राजथान सिंह यांनी केले आहे.
राजनाथ सिंह ट्विट:
कोरोना व्हायरसचा धोक्यामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरी परतत असलेल्या अनेक मजूरांच्या अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी मध्य प्रदेश मध्ये झालेल्या अपघातात 8 मजूरांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले होते. तर औरंगाबाद येथे रुळावर झोपलेल्या 16 मजूरांचा मालगाडीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला होता.