Paytm FASTag: पेटीएम वापरकर्त्यांनी 15 मार्चपूर्वी इतर बँकांकडून नवीन फास्टॅग घ्यावा, NHAI चा सल्ला; जारी केली सुधारीत 39 बँकांची यादी

ऑनलाइन, तुम्ही फोनपे वापरून किंवा बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन आणि आवश्यक तपशील भरून फास्टॅग मिळवू शकता.

Fastag (Photo Credits: Twitter)

Paytm Users to Get New FASTag: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बुधवारी अधिकृत निवेदन जारी करून पेटीएम फास्टॅग (Paytm FASTag) वापरकर्त्यांना नवीन फास्टॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला. एनएचएआयने म्हटले आहे की, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांनी प्रवासाचा सहज अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आणि टोल प्लाझावरील त्रास टाळण्यासाठी 15 मार्चपूर्वी इतर कोणत्याही बँकेकडून नवीन फास्टॅग घ्यावा. यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना दंड किंवा दुप्पट शुल्क टाळण्यास मदत होईल.

निवेदनात म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेशी संबंधित निर्बंधांवरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्च 2024 नंतर रिचार्ज किंवा त्यांची शिल्लक टॉप-अप करण्याचा पर्याय नसेल. मात्र वापरकर्ते देय तारखेनंतरही टोल भरण्यासाठी विद्यमान शिल्लक वापरणे सुरू ठेवू शकतात.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांची सुधारित यादी जारी केली आहे. आता या यादीत 39 बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा (NBFC) समावेश करण्यात आला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक (PPBL) चे नाव सुधारित यादीत समाविष्ट नाही. भारतीय रिझर्व्ह बँकने पेटीएम पेमेंट बँकेला नियामक नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर अनेक अनियमिततेमुळे 15 मार्च नंतर सर्व बँकिंग क्रियाकलाप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे पेटीएमचा फास्टॅग असेल, तर तुम्ही तो 15 मार्चपर्यंत वापरू शकता. पण या दिवसानंतर जर शिल्लक संपली तर तुम्हाला नवीन फास्टॅग घ्यावा लागेल. (हेही वाचा: UCPMP: केंद्र सरकारने यूसीपीएमपीसाठी एक समान संहिता अधिसूचित केली; आता फार्मा कंपनीद्वारे कोणत्याही आरोग्यसेवा व्यावसायिकाला कोणतीही भेट दिली जाणार नाही)

तुमच्याकडे पेटीएमचा फास्टॅग असल्यास, तुम्ही 15 मार्चपूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी नवीन फास्टॅग मिळवू शकता. ऑनलाइन, तुम्ही फोनपे वापरून किंवा बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन आणि आवश्यक तपशील भरून फास्टॅग मिळवू शकता. ऑफलाइन, तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला किंवा फास्टॅग वितरकाला भेट देऊन नवीन फास्टॅग मिळवू शकता.