IPL Auction 2025 Live

Odisha Train Accident: पीएम नरेंद्र मोदी यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेत बचाव कार्यात सहभागी लोकांच्या कामाचे केले कौतुक; जागतिक नेत्यांच्या शोकसंदेशांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचीही मोदींनी माहिती घेतली. अपघातस्थळी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधानांनी नवी दिल्लीत रेल्वे अपघाताबाबत उच्चस्तरीय बैठकही घेतली.

Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेत (Odisha Train Accident) बचाव कार्यात सहभागी लोकांच्या कामाचे कौतुक केले आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघात ही वेदनादायी घटना असून, जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. या घटनेत दोषी आढळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पीएम मोदी शनिवारी दुपारी बालासोर येथील कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन अपघाताच्या ठिकाणी पोहोचले, जिथे त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदी बालासोरच्या फकीर मोहन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या अपघातामध्ये 288 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पीएम मोदी म्हणाले, ‘प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशातील लोकांनी दाखवलेले धैर्य आणि करुणा खरोखरच प्रेरणादायी आहे. ओडिशात ट्रेनचा अपघात होताच लोक बचावकार्याला मदत करण्यात मग्न झाले. रक्तदान करण्यासाठी अनेक लोक रांगेत उभे होते. मी रेल्वे, एनडीआरएफ (NDRF), ODRAF, स्थानिक अधिकारी, पोलीस, अग्निशमन सेवा, स्वयंसेवक आणि इतर संघातील प्रत्येक व्यक्तीचे कौतुक करतो, जे  अथकपणे काम करत आहेत आणि बचाव कार्याला बळकटी देत ​​आहेत. त्यांच्या समर्पणाचा अभिमान वाटतो.’

पीएम मोदींनी जागतिक नेत्यांच्या शोकसंदेशांबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ओडिशातील रेल्वे दुर्घटनेबद्दल जागतिक नेत्यांच्या शोकसंदेशांनी मनापासून हळहळलो. त्यांचे दयाळू शब्द शोकाकुल कुटुंबियांना बळ देतील. त्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता.’

पीएम मोदी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने बहनगा बाजार स्थानकाजवळ अपघातस्थळी गेले. त्या ठिकाणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना रेल्वे अपघाताची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आणि अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही सांगितले. 3 जून 2023 ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहगना येथे झालेल्या देशातील एका भीषण रेल्वे अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर आणि पीडितांना रुग्णालयात भेटल्यानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. (हेही वाचा: Train Accident Death Toll: ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू, 747 जण जखमी)

दरम्यान, पंतप्रधानांनी ओडिशाच्या महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री प्रमिला मलिक तसेच स्थानिक पोलीस प्रमुख यांच्याशीही चर्चा केली. अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचीही मोदींनी माहिती घेतली. अपघातस्थळी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधानांनी नवी दिल्लीत रेल्वे अपघाताबाबत उच्चस्तरीय बैठकही घेतली.