Mucormycosis चेहरा, नाक, डोळे, मेंदूवर परिणाम करू शकतो; स्टेरॉईडचा गैरवापर हे या रोगामागील मुख्य कारण- Dr. Randeep Guleria

मधुमेह, कोविड पॉझिटिव्ह आणि स्टिरॉइड्स घेत असलेल्या रूग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्गाची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी आपण स्टिरॉइडचा गैरवापर थांबवावा असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले

Dr Randeep Guleria, Director AIIMS (Photo Credits: ANI/Twitter)

देशात कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा चालू असताना आता एका नवीन आजार लोकांच्या चिंता वाढवत आहे तो म्हणजे, म्यूकोर्मिकोसिस (Mucormycosis). याबाबत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनानंतर देशात काळ्या बुरशीच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहेत. याबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शनिवारी त्यांनी सांगितले की, कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता या म्यूकोर्मिकोसिसला रोखण्यासाठी प्रोटोकॉलचा अवलंब करणे आवश्यक आहे. असे दिसून येते की हा सेकंडरी संसर्ग, बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापेक्षाही उच्च मृत्यूदाराचे कारण बनत आहे.

गुलेरिया म्हणाले की, म्यूकोर्मिकोसिसचे बीज माती, हवा आणि अगदी अन्नातही आढळतात. मात्र त्याठिकाणी ते फारच कमकुवत आहेत आणि सामान्यत: संसर्गास कारणीभूत नसतात. कोविडापूर्वी या संसर्गाची फारच कमी प्रकरणे होती. पण आता कोविडमुळे मोठ्या प्रमाणात हा आजार पसरत आहे. त्यांनी सांगितले की या आजाराची देशभरात 500 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. हा रोग चेहरा, नाक, डोळ्याची कक्षा किंवा मेंदू यावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. हा फुफ्फुसात देखील पसरू शकतो.

स्टेरॉईडचा गैरवापर हा या संसर्गामागील मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले. मधुमेह, कोविड पॉझिटिव्ह आणि स्टिरॉइड्स घेत असलेल्या रूग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्गाची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी आपण स्टिरॉइडचा गैरवापर थांबवावा असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटलचे एमडी डॉ सुरेश कुमार म्हणाले की, 90 पेक्षा जास्त 02 पातळी असलेल्या रूग्णाला स्टिरॉइड दिल्यास या रोगाचे दुष्परिणाम दिसू शकतात. यासाठी रोगाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे, जे चेहर्‍याच्या सीटी स्कॅनद्वारे समजू शकते. (हेही वाचा: मधुमेह नियंत्रणात ठेवा, स्टेरॉइड्सचा वापर योग्य प्रमाणात करा, स्वच्छता राखा, स्वयं उपचार करू नका - म्युकरमायकोसिसपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारचा सल्ला)

दरम्यान, लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, 11 राज्यांत 1 लाखांहून अधिक कोरोनाची सक्रिय प्रकरणे आहेत. 8 राज्यांमध्ये 50 हजार ते ते 1 लाख सक्रिय प्रकरणे आहेत आणि 17 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी कमी प्रकरणे आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये घट होताना दिसत आहे.