Minimum Wage Rates for Workers: कामगारांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून किमान वेतन दरात वाढ, 1 ऑक्टोबर पासून नवे दर लागू
केंद्र सरकार 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे औद्योगिक कामगारांसाठी वर्षातून दोनदा परिवर्तनीय महागाई भत्ता सुधारित करते.
Minimum Wage Rates for Workers: कामगारांना, विशेषत: असंघटित क्षेत्रातील (Unorganized Sector) कामगारांना आधार देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कामगारांना जगण्याच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. इमारत बांधकाम, सामानाचे लोडिंग आणि अनलोडिंग, वॉचमन, साफसफाई, स्वच्छता, घरकाम, खाणकाम आणि शेती यासह केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांमधील विविध क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कामगारांना सुधारित वेतन दरांचा फायदा होईल. नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. यापूर्वी, कामगार दरांची शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती.
किमान वेतन दर हे अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि उच्च कुशल अशा कौशल्य पातळीच्या आधारावर वर्गीकृत केले जाते. तसेच ते भौगोलिक क्षेत्रांच्या आधारावर A, B आणि C मध्ये देखील विभागले गेले आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर बांधकाम, साफसफाई, रिफायनिंग, लोडिंग आणि अनलोडिंग यांसारख्या अकुशल काम क्षेत्रातील कामगारांसाठी सेक्टर 'ए' मधील किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (20,358 रुपये प्रति महिना), अर्ध-कुशल लोकांसाठी ते 868 रुपये प्रतिदिन (रु. 22,568 प्रति महिना) असेल. याशिवाय कुशल कर्मचारी, लिपिक आणि निशस्त्र वॉचमन किंवा सेन्टीनलसाठी प्रतिदिन 954 रुपये (रु. 24,804 रुपये) आणि अत्यंत कुशल आणि सशस्त्र वॉचमन किंवा सेन्टिनेलसाठी, प्रतिदिन 1,035 रुपये (रु. 26,910 प्रति महिना) दिले जातील. (हेही वाचा: 2024 Hurun India Under 35s: 'हुरून इंडिया अंडर-35' ची यादी जाहीर; Isha Ambani, Akash Ambani, Ghazal Alagh यांचा समावेश, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट)
केंद्र सरकार 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे औद्योगिक कामगारांसाठी वर्षातून दोनदा परिवर्तनीय महागाई भत्ता सुधारित करते. विविध प्रकारचे काम, श्रेणी आणि क्षेत्रांनुसार किमान वेतन दरांची तपशीलवार माहिती मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय), भारत सरकार (clc.gov.in) यांच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.