Madhya Pradesh: सामुहिक बलात्काराच्या खोट्या प्रकरणात व्यक्तीने भोगली 2 वर्षांची शिक्षा; आता सरकार व पोलिसांवर ठोकला 10 हजार कोटींचा दावा
मुलांचे शिक्षण सुटले. आता त्याला पुन्हा समाजात सन्मान तसेच रोजगार मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.
रतलाम (Ratlam) जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने मध्य प्रदेश सरकार आणि पोलिसांवर 10 हजार कोटींहून अधिकचा दावा ठोकला आहे. पीडित व्यक्तीचा आरोप आहे की, एका सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात तो निर्दोष असल्याचे समजल्यानंतरही पोलिसांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवले आणि त्यामुळे त्याला दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले. कारागृहात आपण अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या तसेच घडल्या प्रकारामुळे आपले कुटुंबीयही रस्त्यावर आले असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.
आता त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीबाबत त्याने आवाज उठवला आहे. यामुळे झालेल्या ‘दु:खाचा आणि मानसिक त्रासाचा’ हवाला देत त्याने आपल्या वकिलामार्फत सरकार व पोलिसांवर हा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता 10 जानेवारीला होणार आहे.
हे प्रकरण रतलाम जिल्ह्यातील घोराखेडा येथील रहिवासी कांतीलाल सिंग उर्फ कांतु याच्याशी संबंधित आहे. कांतीलालने सांगितले की, त्याला पोलिसांनी एका सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी बनवले होते, ज्याच्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता. आपल्याला पोलिसांनी बळजबरीने खोट्या प्रकरणात अडकवल्याचा कांतीलालचा आरोप आहे. गेली पाच वर्षे तो या प्रकरणाचा त्रास सहन करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तीन वर्षे पोलीस त्याचा छळ करत राहिले आणि नंतर त्याला दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले.
दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर आता जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. कांतीलाल यांच्या वतीने दावा मांडणारे वकील विजय सिंह यादव म्हणतात की, मानवी जीवनाचे कोणतेही मूल्य निश्चित केले जाऊ शकत नाही. पोलीस आणि राज्य सरकारमुळे कांतूचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. निर्दोष असूनही दोन वर्षे तुरुंगात राहून त्याला यातना सहन कराव्या लागल्या. त्याच्या पश्चात वृद्ध आई मीरा, पत्नी लीला आणि तीन मुले असा परिवार आहे. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. (हेही वाचा: Karnataka: विकृतीचा कळस! 24 वर्षीय तरुणाचा गायीच्या वासरावर बलात्कार; कृत्य करताना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल)
वकिलांनी पुढे सांगितले की, ‘कांतीलाल दोन वर्षे तुरुंगात असल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण सुटले. आता त्याला पुन्हा समाजात सन्मान तसेच रोजगार मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. या कारणास्तव हा दावा करण्यात आला आहे. तसेच यातून महिलांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करू नये असा संदेशही आपल्याला समाजाला द्यायचा आहे.’