Madhya Pradesh: माता न तूं, वैरिणी! कुऱ्हाडीचे घाव घालून आईने केली 24 वर्षीय मुलाची हत्या; अंधश्रद्धेतून घडले कृत्य

भारतीय समाजात अंधश्रद्धा (Superstition) किती खोलवर रुजली आहे याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आताही मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका आईने आपल्या मुलाचा बळी घेतला आहे.

प्रतिकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय समाजात अंधश्रद्धा (Superstition) किती खोलवर रुजली आहे याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आताही मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका आईने आपल्या मुलाचा बळी घेतला आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात (Panna District) अंधश्रद्धेमुळे एका आईने देवीला खुश करण्यासाठी आपल्या 24 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. पन्ना जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील कोहनी या गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून इथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पन्ना कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुण सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचारच्या सुमारास कोहनी गावातील 50 वर्षीय महिला, सुनिया बाई लोधीने आपला मुलगा द्वारका याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून सुनियाबाईंच्या अंगात येत आहे. जेव्हा देवी अंगात येते तेव्हा त्या स्वतःला देवीचे रूप मानतात. काल रात्री अशीच गोष्ट घडली व त्याच भावनेमध्ये त्यांनी आपल्या मुलाचा बळी घेतला. कायदेशीर कारवाईनंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात असल्याचे सोनी यांनी सांगितले. (हेही वाचा: कल्याण येथे अंधश्रद्धेमुळे परिवारातील दोन जणांचा बळी, तांत्रिकासह आरोपींना पोलिसांकडून अटक)

या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेत वापरलेली कुऱ्हाडही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यापूर्वीही महिलेच्या अंगात देवी येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळी ती लोकांना मारून टाकण्याची भाषा करत असे. घटनेच्या वेळी घरात सुनियाबाई, तिचा नवरा आणि मुलगा होते. रात्री पती मुलगा झोपले असताना तिने मुलावर हल्ला केला. त्यानंतर तिने, ‘आपण आपले काम केले, बळी घेतला’ असे आपल्या नवऱ्याला सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement