Madhya Pradesh: विदिशा जिल्ह्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या; गुन्हा दाखल, तपास सुरु

बलात्कारासारख्या (Rape) घटनांमुळे तर नेहमीच समाज सुन्न होतो. याबाबत आवाज उठवला जात आहे, मात्र त्याला पुरेसे यश मिळत नाहीये. आता अशीच एक लाजीरवाणी आणि भयानक घटना मध्य प्रदेशामधून (Madhya Pradesh) समोर येत आहे.

Representational Image | (Photo Credits: IANS)

देशात कडक कायदे असूनही रोज स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बलात्कारासारख्या (Rape) घटनांमुळे तर नेहमीच समाज सुन्न होतो. याबाबत आवाज उठवला जात आहे, मात्र त्याला पुरेसे यश मिळत नाहीये. आता अशीच एक लाजीरवाणी आणि भयानक घटना मध्य प्रदेशामधून (Madhya Pradesh) समोर येत आहे. मध्य प्रदेशातील विदिशा (Vidisha) मध्ये एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही वृद्ध महिला तिच्या शेतात सिंचनाची पाहणी करण्यासाठी गेली असता ही घटना घडली. काही अज्ञात व्यक्तींनी या महिलेच्या तोंडावर माती भरून तिच्या खाजगी भागावर लाठी हल्ला केला.

ही काळीज हलवणारी घटना विदिशा जिल्ह्यातील ग्यारसपूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या, ओलीजा गावाच्या परिसरातील आहे. या ठिकाणी 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी सत्तर वर्षाच्या महिलेवर अत्याचार करून तिला ठार मारले. ही वृद्ध महिला पेरणीच्या हंगामापूर्वी शेतात होत असलेल्या सिंचनाची पाहणी करण्यासाठी तेथे गेली होती. गुरुवारी सकाळी गावाच्या बाहेरील बाजूस शेतात झुडूपांमध्ये महिलेचा नग्न मृतदेह पाहून ग्रामस्थांनी 100 नंबरवर पोलिसांशी संपर्क साधला.

ग्यारसपुर पोलिस ठाण्याचे प्रभारी महेंद्र शाक्य यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मृत पीडीतेचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तिची ओळख पटविली. त्यानंतर जिल्ह्यातील उच्च पोलिस अधिकारी, विदिशा जिल्हा मुख्यालयातील फॉरेन्सिक तज्ञांसह घटनास्थळी पोहोचले. आता महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. (हेही वाचा: Delhi: दिल्लीत 98 टक्के बलात्काराच्या प्रकरणांमध्ये आरोपी पिडीतेचे नातवाईक किंवा जवळचे परिचित- Police)

शाक्य यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत ही बलात्कार आणि हत्येची घटना असल्याचे दिसते. पीडित महिलेवर पाशवी हल्ला करण्यात आला आहे. आता अज्ञात आरोपींविरोधात बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची ओळख पटवून अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील लोक संतापले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास वेग वाढवण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.