Loan Recovery Agents: कर्ज वसुली एजंट्सकडून कर्जदाराचा छळ, अपमानास्पद भाषेचा वापर थांबणार; RBI ने जारी केले परिपत्रक
जर कर्ज वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही सर्वप्रथम बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल बँकेला कळवू शकता आणि कर्ज परतफेडीच्या अटींमध्ये बदल करण्याची विनंती करू शकता.
अनेकवेळा लोकांना नाईलाजाने कर्ज (Loan) घ्यावे लागते, परंतु काहीवेळा अशी परिस्थिती उद्भवते की ते हप्ता भरण्यास असमर्थ ठरतात. मात्र त्यामुळे बँकांचे कर्ज वसुली एजंट कर्जदारांना हप्त्याच्या वसुलीसाठी त्रास देऊ लागतात. काही वेळा शिवीगाळ आणि मारहाण असे प्रकारही घडतात. परंतु हे एजंट आता तसे करू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबतचे आपले नियम कडक केले आहेत. आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्या नियामक कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना हे सुनिश्चित करावे लागेल की, त्यांचे कर्ज वसुली एजंट कर्जदारांना त्रास देणार नाहीत.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जूनमध्ये एका परिषदेत सांगितले होते की, कर्ज वसुली एजंट कर्जदारांना कधीही कॉल करतात आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतात, हे अजिबात मान्य नाही. सेंट्रल बँक अशा गोष्टी गांभीर्याने घेत आहे आणि कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना त्यांच्या कर्ज वसुली एजंटांनी आपले वर्तन सुधारण्यास सांगितले आहे. या संदर्भात आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नवीन परिपत्रक जारी केले आहे.
हे परिपत्रक सर्व व्यावसायिक बँका, बँक नसलेल्या वित्तीय कंपन्या, मालमत्ता पुनर्रचना कंपनी, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि सर्व नागरी सहकारी बँकांना लागू आहे. आरबीआय बँकेचे म्हणणे आहे की कर्जदारांच्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना त्रास देण्याच्या घटना थांबवल्या गेल्या पाहिजेत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी कर्जदारांना आक्षेपार्ह संदेश पाठवणे, सोशल मीडियावर बदनामी करणे या घटना थांबवाव्यात.
आरबीआयने नवीन परिपत्रकात म्हटले आहे की, नियमांनुसार, ग्राहकांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कर्ज वसुलीसाठी फोन केले जाऊ शकत नाहीत. रिकव्हरी एजंट्सनी नियमांचे योग्य प्रकारे पालन केले पाहिजे, हे संस्थांनी सुनिश्चित करावे. आरबीआयच्या परिपत्रकानुसार, बँका किंवा संस्था आणि त्यांच्या एजंटना जनतेला कोणत्याही प्रकारच्या धमक्या किंवा छळवणुकीचा अवलंब न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कर्जाची वसुली करण्याच्या प्रयत्नात एजंट्स कोणत्याही व्यक्तीविरुद्ध शाब्दिक किंवा शारीरिक कृत्यांचा वापर करणार नाहीत, असेही स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: रेल्वे प्रोटेक्शन फोर्स रेल्वे पदभरती संबंधी भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, पदभरती होणार नसल्याचं भारतीय रेल्वेचं स्पष्टीकरण)
जर कर्ज वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही सर्वप्रथम बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल बँकेला कळवू शकता आणि कर्ज परतफेडीच्या अटींमध्ये बदल करण्याची विनंती करू शकता. जर बँकेने तुमच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण केले नाही, तर तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता. यासोबतच बँकिंग नियामक आरबीआयकडेही तक्रार करता येईल. रिझर्व्ह बँक त्या बँकेला आदेश देऊ शकते आणि विशेष प्रकरणांमध्ये दंडही आकारू शकते. आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर ग्राहकांकडून तक्रार आली तर ती गांभीर्याने घेतली जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)