Kerala Shocker: दात घासण्याबाबतच्या भांडणामध्ये पतीने केली पत्नीची हत्या; जाणून घ्या सविस्तर

याच भांडणामध्ये अविनाशने दीपिकावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिचे रडणे, आरडा-ओरडा ऐकून शेजारील लोक दीपिकाच्या बचावासाठी आले.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

अगदी क्षुल्लक कारणांवरून हत्या घडल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता केरळमध्येही (Kerala) अशीच घटना घडली आहे. एका धक्कादायक घटनेत, मंगळवारी केरळमधील पलक्कड (Palakkad) थे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. दात न घासता आपल्या लहान मुलाचे चुंबन घेतल्यावर पत्नीने आक्षेप घेतल्याच्या रागातून पतीने ही हत्या केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी सकाळी पत्नी दीपिकाने पती अविनाशने दात न घासता आपल्या अडीच वर्षाच्या मुलाचे चुंबन घेतल्यावर आक्षेप घेतल्याची घटना घडली होती.

त्यानंतर या मुद्द्यावर पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली व पुढे ती भांडणामध्ये रुपांतरीत झाली. याच भांडणामध्ये अविनाशने दीपिकावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिचे रडणे, आरडा-ओरडा ऐकून शेजारील लोक दीपिकाच्या बचावासाठी आले आणि तिला त्वरीत पेरिंथलमन्ना जवळच्या रुग्णालयात हलवले. परंतु तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतले आहे. अविनाश बेंगळुरूमध्ये काम करत होता आणि दोन महिन्यांपूर्वीच तो पलक्कडला परतला होता.

दरम्यान, याआधी दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी येथे एका 47 वर्षीय ड्रायव्हरने पत्नीने जेवण देण्यास नकार दिल्याने तिची कथितरित्या त्याची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, नंतर  आरोपीला पत्नी मृत झाल्याचे लक्षात न आल्याने तो मृतदेहाशेजारी झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समजल्यावर तो पळून गेला. (हेही वाचा: धक्कादायक! बायको कामावरून उशिरा घरी येते म्हणून पतीने गळा चिरून केली हत्या)

दुसऱ्या एका घटनेमध्ये, खारट जेवण दिल्याच्या रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली मुंबईत एका 46 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि गेल्या आठवड्यात खारट खाण्यावरून तो तिच्याशी अनेकदा भांडला होता.