Kanpur: रुसून माहेरी गेलेल्या बायकोला परत घेऊन येण्यासाठी मागितली सुट्टी; सरकारी अधिकाऱ्याचा रजेचा अर्ज व्हायरल (See Letter)
आता अशाप्रकारे मानसिकदृष्ट्या त्रासलेल्या लिपिकाने गटशिक्षणाधिकार्यांना पत्र लिहून संतप्त पत्नीला माहेरहून परत आणण्यासाठी सुट्टी मागितली.
कानपूरच्या (Kanpur) एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहून, त्याच्या माहेरी गेलेल्या असंतुष्ट पत्नीला समजावून परत आणण्यासाठी तीन दिवसांची सुट्टी मागितल्याची घटना समोर आली आहे. या लिपिकाने लिहिलेले रजेचे पत्र व्हायरल झाले आहे. मूलभूत शिक्षण विभागाच्या प्रेम नगर ब्लॉक शिक्षण कार्यालयात नियुक्त लिपिक शमशाद अहमद हे सतत विभागीय कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर पर्त्नी रागावून मुलांसह तिच्या माहेरी निघून गेली.
त्यानंतर लिपिक शमशाद अहमद यांनी फोनवरून पत्नीचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. आता अशाप्रकारे मानसिकदृष्ट्या त्रासलेल्या लिपिकाने गटशिक्षणाधिकार्यांना पत्र लिहून संतप्त पत्नीला माहेरहून परत आणण्यासाठी सुट्टी मागितली. हे पत्र इंटरनेट मीडियावर व्हायरल झाले. गटशिक्षणाधिकारी दीपक अवस्थी यांनी सांगितले की, लिपिकाच्या रजा मंजूर झाल्या आहेत.
पहा पत्र-
शमशाद अहमद यांनी प्रेम नगरच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) यांना पत्र लिहून त्यांना तात्काळ रजेची गरज का आहे हे स्पष्ट केले आहे. अहमद यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘महोदय, तुमच्या निदर्शनास आणून द्यावयाचे आहे की, पत्नीशी काही कारणावरून वाद झाले होते. यावर पत्नी मोठी मुलगी व दोन मुलांसह रागाच्या भरात माहेरी गेली असून, त्यामुळे अर्जदार मानसिकदृष्ट्या दुखावला आहे. पत्नीला माहेरुहून तिची समजूत काढून आणण्यासाठी तिच्या गावी जावे लागेल. म्हणून, आपणास विनंती आहे की कृपया अर्जदारास 4.8.2022 ते 6.8.2022 पर्यंत प्रासंगिक रजा मंजूर करून, स्टेशन सोडण्याची परवानगी द्यावी.’ (हेही वाचा: Rajasthan: बायकोला मित्रासोबत पाहून नवऱ्याचा फिरला माथा, झाडाला बांधून केली बेदम मारहाण)
आता लिपिक गावी गेल्याची माहिती मिळाली आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेश मूलभूत शिक्षण परिषद कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष मोहम्मद परवेझ आलम यांनी उच्च अधिकाऱ्यांना पत्र लिहून, सुट्टीच्या काळात कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावू नये, अशी मागणी केली आहे. तसेच कामाच्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत काम केल्यामुळे कुटुंबात भांडणे होतात, असेही निदर्शनास आणून दिले आहे.