Kamiya Jani Jagannath Temple Visit: युट्युबर कामिया जानीने दिली जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराला भेट; ओडिशा भाजपकडून अटकेची मागणी, जाणून घ्या प्रकरण
गोमांस सेवनाला कथितपणे प्रोत्साहन देणार्या जानीला पुरी येथील 12व्या शतकातील मंदिरात जाण्याची परवानगी कशी दिली गेली? या ठिकाणी बिगर हिंदूंना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे, तरी ती आत कशी गेली? असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत.
प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) कामिया जानीच्या (Kamiya Jani) एका व्हिडिओवरून वाद सुरू झाला आहे. हा वाद इतका वाढला आहे की, त्यात आता भाजपने (BJP) उडी घेतली आहे. कामिया जानी हिला अटक करून तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. ज्या व्हिडिओमुळे वाद सुरु झाला, त्या व्हिडिओमध्ये कामिया जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात (Jagannath Temple) दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती मंदिराच्या आवारात उभी राहून बीजेडी नेते व्हीके पांडियन यांच्याशी बोलत आहे. पांडियन तिला महाप्रसादाचे महत्त्व, हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्प आणि मंदिर विकासाची माहिती देत आहेत.
यावर गोमांस सेवनाला कथितपणे प्रोत्साहन देणार्या जानीला पुरी येथील 12व्या शतकातील मंदिरात जाण्याची परवानगी कशी दिली गेली? या ठिकाणी बिगर हिंदूंना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे, तरी ती आत कशी गेली? असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत. कामिया जानी हिने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपने केला आहे. ती गोमांस खाते. गाय आमची माता आहे. जिने गोमांस खाल्ले तिला जगन्नाथ पुरीच्या मंदिरात प्रवेश देणे चूक आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. यामध्ये कामिया जानी हिला पाठिंबा देणाऱ्या बिजू जनता दलाचे नेते व्हीके पांडियन यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच पुरी शंकराचार्य आणि पुजारी यांच्याशी सल्लामसलत करून मंदिरात अभिषेक करण्यात यावा, असेही पक्षाने म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत वाद वाढत असताना, जानीने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये याबाबत तिची बाजू मांडली आहे. ती म्हणते, ‘भारतीय असल्याने, भारतीय संस्कृती आणि वारसा जगासमोर नेणे हे माझे ध्येय आहे. मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंगांना आणि चार धामांना भेट दिली आहे आणि हा एक विशेषाधिकार आहे. माझ्या जगन्नाथ मंदिराच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याबाबत अजूनतरी माझ्याशी कोणी संपर्क साधला असे नाही, पण मला फक्त हे स्पष्ट करायचे आहे की, मी गोमांस खात नाही आणि मी कधीच खाणार नाही. जय जगन्नाथ!’ (हेही वाचा: Ram Temple Inauguration: अयोध्येत 22 जानेवारीला केवळ निमंत्रित आणि सरकारी ड्युटीवर असलेल्या लोकांनाच प्रवेश; हॉटेल्सचे प्री-बुकिंग होणार रद्द)
यासह बीजेडीने पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्ष बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावाही त्यांनी केला. मंदिराच्या विकासाबाबत भाजप असहिष्णू असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कामिया जानी कर्ली टेल्सची संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. ही फोर्क मीडिया ग्रुपची कंपनी आहे. कामिया कर्ली टेल्स नावाने एक यूट्यूब चॅनल चालवते. ती चॅनलवर खाद्यपदार्थ आणि प्रवासाशी संबंधित व्हिडिओ प्रकाशित करते. कामिया जानी हिने मीडियामध्ये बिझनेस रिपोर्टर आणि टीव्ही अँकर म्हणून काम केले आहे. जगाचा प्रवास करण्यासाठी, तिने तिची पूर्णवेळ नोकरी सोडून दिली. तिने जगातील 172 हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)