शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास बोईसर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या 'तारा नायट्रेट' या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 8 जण ठार आणि अनेक जखमी झाले आहेत. पालघरचे पोलिस अधीक्षक (एसपी) गौरव सिंग दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर जखमींना तातडीने पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महान फलंदाज सुनील गावस्कर 26 व्या लाल बहादूर शास्त्री स्मारक व्याख्यानमालेदरम्यान म्हणाले, "देश संकटात आहे. आमचे काही तरुण रस्त्यावर आहेत, जेव्हा ते त्यांच्या वर्गात असले पाहिजेत. त्यातील काही जणांना तर रस्त्यावर उतरण्यासाठी रुग्णालयात जावे लागले." तसेच विद्यार्थ्यांना सल्ला देत ते म्हणाले की त्यांना अशा भारतावर विश्वास आहे जिथे संकटाच्या काळावर मात करत लोक पुन्हा नव्याने उभे राहतात.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक 19 फेब्रुवारी रोजी, दिल्ली येथे होणार आहे. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणे जवळजवळ निश्चित आहे. अशा परिस्थितीत ते पक्षाचे 11 वे अध्यक्ष असल्याचे मानले जाते. सध्या भाजपमध्ये संघटना निवडणुका सुरू आहेत. भाजपच्या राज्यघटनेनुसार 50 टक्क्यांहून अधिक राज्य घटकांच्या निवडणुकांनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाऊ शकतात. 19 फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेशांच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईल, असा विश्वास आहे.
दिल्लीत एका कारखान्याला आग लागली आहे. मायापुरी भागातील पादत्राणे बनविण्याच्या फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 23 गाड्या 90 अग्निशमन दलासह घटनास्थळी हजर झाले आहेत आणि आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास दिल्लीच्या मायापुरी फेज 2 परिसरातील पादत्राणे बनविण्याच्या कारखान्यात भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या 23 इंजिन आग विझवित आहेत. आगीत कुणीही अडकले असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
उस्मानाबाद येथे चालू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यंदाही वादाचे गालबोट लागले. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला होता, त्या प्रकरणानंतर आता आज साहित्य संमेलनातील परिसंवाद बंद पाडण्यात आला. 'समाजात बुवाबाजीचं प्रस्थ वाढतंय का?' या विषयावर हा परिसंवाद होता. यावेळी धर्माबद्दल वाद उफाळून आला व हा परिसंवाद मध्येच बंद पाडण्यात आला.
मुंबई (Mumbai) येथे बीएमसीच्या नायर रुग्णालयात (Nair Hospital) डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रूग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या हल्ल्यानंतर नायर रुग्णालयाचे डॉक्टर संपावर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हल्ला केला.
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी शुक्रवारी जेएनयू मधील हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असं वक्तव्य केलं होतं.
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे यांची तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली.
गुजरात राज्यातील बडोदा येथील ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातल्या सारथी संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजे यांनी आज पुण्यात लाक्षणिक उपोषण केलं. दरम्यान, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सारथी संस्थेने केलेल्या विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संभाजीराजे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांना तात्काळ बाजूला करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. (वाचा - पुणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे )
लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात मोठे विधान केलं आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर भारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल, तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान नरवणे यांनी केले आहे. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी लाईव्ह दाखवा, अशी मागणी 'परी' (पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया) या सामाजिक संस्थेने केली आहे. यासाठी परी संस्थेने माहिती प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहलं आहे.
शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेना विरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांची तानाजी सावंत यांच्यावर नाराजी आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे.
केरळमधील मदुराई येथे अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात येत आहेत. शनिवारी येथील H2O हॉली फेथ अपार्टमेंट टॉवर स्फोटकं लावून पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'सारथी' संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजे पुण्यात उपोषण करणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा तरुणांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य करणारा 'सारथी उपक्रम' बंद करायचा डाव असल्याचा आरोप करत संभाजीराजे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईत परतले आहेत. उस्मानाबादमध्ये चालू असलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीपासून त्यांना पाठीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे दिब्रिटो यांनी आज मुंबईतील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या फादर दिब्रिटो यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. जानेफळ-मेहकर मार्गावर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये संजय रायमुलकर यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबाद येथील महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता की, यामध्ये रायमुलकर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.
युक्रेनच्या विमान कंपनीच्या बोईंग 737 या प्रवासी विमानाचा बुधवारी (8 जानेवारी) अपघात झाला होता. आता याबाबत इराणी लष्कराकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. आपल्याकडून युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडले गेल्याची कबुली इराणी सैन्याने दिली आहे. हे विमान बुधवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळले होते. या विमानातील 167 प्रवासी आणि 9 विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 5 पैशांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोलसाठी मुंबईकरांना प्रति लिटर 81.60 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच डिझेलच्या दरात वाढ 13 पैशांची वाढ झाली असून डिझेलसाठी प्रतिलिटर 72.53 रुपये मोजावे लागणार आहेत.
उद्यापासून (रविवार) गाई-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. राज्यातील दूध कल्याणकारी संघाने याबाबत निर्णय घेतला आहे. नव्या दरांनुसार, गाईचे दूध 48 रुपये तर म्हशीचे दूध 58 रुपये झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचणार आहे. तसेच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गावर आणि पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. परिणामी, रविवारी लोकलफेऱ्या सुमारे २० मिनिट उशिराने धावणार आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
तसेच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील कन्नौज (Kannauj) येथे प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात टक्कर होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)