'पतीकडे सतत कुटुंबापासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे ही एक प्रकारची क्रूरता'- Delhi High Court

न्यायालयाने असेही नमूद केले आहे की 2007 पासून पत्नी तिच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरली आहे आणि पतीला वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) घटस्फोटाच्या (Divorce) प्रकरणात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले की, जर पत्नी कोणत्याही वैध कारणाशिवाय पतीच्या कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरत असेल तर ते पतीसाठी क्रूरतेचे कृत्य ठरू शकते आणि हे घटस्फोटाचे कारण देखील आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पत्नीने घटस्फोटाला कोणताही आक्षेप नसल्याचे सूचित केल्यानंतर क्रूरता आणि त्याग या कारणास्तव दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.

या प्रकरणात पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पतीचा आरोप होता की, त्याची पत्नी त्याला विनाकारण त्याच्या कुटुंबापासून वेगळे राहण्याचा आग्रह करत आहे. यामुळे पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र तिथे त्याला घटस्फोट मंजूर झाला नाही. (हेही वाचा: Married Man’s Girlfriend and Section 498A: 'विवाहित पुरुषावर त्याची प्रेयसीवर कलम 498A अंतर्गत क्रूरतेसाठी खटला चालवू शकत नाही'- Kerala High Court)

अहवालानुसार, या प्रकरणात नोव्हेंबर 2000 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. या विवाहातून त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर पत्नीने 2003 मध्ये तिचे विवाहित घर सोडले. मात्र ती नंतर परत आली, परंतु जुलै 2007 मध्ये पुन्हा निघून गेली. या खटल्यातील तथ्ये लक्षात घेऊन न्यायालयाने सांगितले की, महिलेने तिच्या सासरचे घर सोडणे यावरून केवळ एकच निष्कर्ष काढता येईल की, पत्नीला पतीच्या कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे राहायचे होते. मात्र यासाठी तिच्याकडे कोणतेही वैध कारण नाही.

उच्च न्यायालयाने पुढे नमूद केले की, पतीकडे सतत वेगळे राहण्याचा आग्रह करणे ही क्रूरता आहे. न्यायालयाने असेही नमूद केले आहे की 2007 पासून पत्नी तिच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरली आहे आणि पतीला वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. पत्नीच्या वागण्यावरून असे दिसून येते की, तिला या वैवाहिक संबंधात रस नाही. या प्रकरणात पत्नीने पतीच्या कुटुंबीयांवर अनेक खोटे आरोप करून त्यांना सतत पोलीस ठाण्यात बोलावण्याची धमकी दिली होती. हेही क्रूरतेचे कृत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले त्यामुळे उच्च न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला.