India's First Bullet Train: देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार; रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती
मुंबई ते ठाणे दरम्यान बांधण्यात येणाऱ्या समुद्राखालील बोगद्याच्या डिझाईनचे काम पूर्ण झाले असून, बांधकामाला सुरुवात झाली आहे.
देशातील पहिली बुलेट ट्रेन (India's First Bullet Train) 2026 मध्ये धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये याची घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले की, अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे व भारताच्या या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे,
त्यांनी पुढे सांगितले की, 272 किलोमीटरचा व्हायाडक्ट किंवा रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आला आहे. हे काम एवढ्या वेगाने सुरू आहे की 12-14 किलोमीटरचा मार्ग एका महिन्यात पूर्ण होत आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील मान्यता आणि जमीन अधिग्रहणाबाबतची सर्वात मोठी अडचण आता दूर झाली असून, भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
मुंबईतील बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मधील संपूर्ण टर्मिनल स्टेशन भूमिगत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. मुंबई ते ठाणे दरम्यान बांधण्यात येणाऱ्या समुद्राखालील बोगद्याच्या डिझाईनचे काम पूर्ण झाले असून, बांधकामाला सुरुवात झाली आहे. 8 नद्यांवर 8 पूल बांधण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. यानंतर साबरमती येथील डेपोचे कामही वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल.
ते म्हणाले की, बुलेट ट्रेनचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प हा परिवहन आणि पायाभूत सुविधांचा प्रकल्प मानू नये, हा प्रादेशिक विकास प्रकल्प आहे, यावर रेल्वेमंत्र्यांनी भर दिला. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, जपानमधील टोकियो ते ओसाका दरम्यान बुलेट ट्रेन धावते. मध्ये पाच शहरे आहेत. टोकियो, नागोया, कुबेरा, क्योटो आणि ओसाका ही पाच मोठी अर्थव्यवस्था आहेत, जेव्हा हायस्पीड ट्रेन त्यांना जोडते, तेव्हा या पाचही अर्थव्यवस्था एकत्र होतात. (हेही वाचा: PM Narendra Modi on Indian Economy in Nashik: भारत जगातील टॉप-5 क्रमांकाची अर्थव्यवस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
त्याचप्रमाणे भारतामध्ये बांधण्यात येणारा पहिला विभाग मुंबई-ठाणे-वापी-सुरत-वडोदरा-आनंद-अहमदाबाद आहे. या सर्व अर्थव्यवस्था मिळून एक अर्थव्यवस्था होईल. हायस्पीड ट्रेनची सोय अशी आहे की, कोणीही व्यक्ती एका शहरातून दुसऱ्या शहरात कामासाठी गेल्यास त्याचदिवशी आपल्या घरी परत येऊ शकेल. या प्रकल्पाची 2017 मध्ये घोषणा करण्यात आली होती आणि तो 2022 पर्यंत पूर्ण व्हायचा होता, परंतु या प्रकल्पाची मुदत सतत वाढत आहे. वैष्णव यांनी या संपूर्ण प्रकल्प कधी सुरु होणार याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.