Indian Railways प्रवाशांचा हलका करणार भार! आता घरापासून ते तुमच्या आरक्षित रेल्वे आसानापर्यंत पोहोचवणार प्रवाशांचे सामान, जाणून घ्या सविस्तर

या सेवेचा लाभ ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. म्हणजेच अगदी मोबाईलवरुनही या सेवेसाठी प्रवासी अर्ज करुन आपला प्रवास अधिक सुखकर करु शकतात.

Indian Railways (Photo Credits: PTI)

लांबचा प्रवास म्हटला की सामान हे ओघाओघाने आलेच. त्यात रेल्वे प्रवास असेल तर ते सामान प्लॅटफॉर्मला नेईपर्यंत तारेवरची कसरत करावी लागते. रेल्वे स्टेशनचे जिने चढा आणि उतरा यांसारखे अनेक उपदव्याप करावे लागतात. अशा वेळी रेल्वे प्रवाशाची खूप दमछाक होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) नवी सेवा सुरु केली आहे. यात आता रेल्वे प्रवाशाचे सामान त्याच्या घरापासून ते आरक्षित स्थानापर्यंत पोहोचवले जाणार आहे. या सेवेचा लाभ ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. म्हणजेच अगदी मोबाईलवरुनही या सेवेसाठी प्रवासी अर्ज करुन आपला प्रवास अधिक सुखकर करु शकतात.

रेल्वे प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी भारतीय रेल्वेने ही शक्कल लढवली आहे. ही सेवा सुरु करताना त्याचे दर हे सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारे आहेत. तसचे त्यांचे सामान सुरक्षित राहील याची देखील काळजी घेण्यात येईल असे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Fact Check: ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून वसूल केले जातायत अधिक पैसे? रेल्वेने दिले स्पष्टीकरण

नेमकी काय आहे ही सेवा?

या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage च्या अ‍ॅपच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. वेबसाईट किंवा अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना आपल्या रेल्वे आरक्षासंदर्भातील माहिती आणि सामानासंदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे. ट्रेन निघण्याच्या चार ते पाच तास आधी प्रवाशांच्या घरुन सामान घेतलं जाईल आणि ते थेट त्यांच्या सीटपर्यंत पोहचवण्यात येईल. या सेवेसाठी सामानाचा आकार आणि वजनावरआधारीत शुल्क द्यावे लागणार आहे. 50 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत शुल्क या सेवेसाठी आकरण्यात येईल.

या सेवेमध्ये सुरक्षेची हमी देण्यासाठी विमानतळांवरील सामानाप्रमाणे प्रवाशांच्या समानावर बारकोड स्टीकर लावले जाणार आहेत. हे बारकोड स्कॅन करुन प्रवाशांना सामान नक्की कुठे आहे यासंदर्भातील माहिती थेट मोबाईल मिळणार आहे. हे सामान पोहचवताना करोनाच्या कालावधीमध्ये सामानाच्या सॅनिटायझेशनची आणि स्वच्छतेचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे. या सेवेसाठी रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील हमालांनाही सहभागी करुन घेतलं आहे. त्यामुळे या हमालांनाही या सेवेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.