India GDP Rate: भारतीय अर्थव्यवस्थेने घेतला वेग; 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत 13.5 टक्के राहिला आर्थिक विकास दर

आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा वाढीचा दर 9.2 टक्के राहिला, जो गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 2.3 टक्के होता.

Representational Image (Photo Credits: Facebook/Dr Jitendra Singh)

कोरोना विषाणू साथीच्या दोन वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) वाढीचा दर चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 13.5 टक्के नोंदवला गेला. 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत तो 20.1 टक्के होता. चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च दरम्यान देशाचा आर्थिक विकास दर 4.1 टक्के होता. 2021-22 मध्ये देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे जीडीपी वाढीचा दर वाढला आहे.

2022 -23 च्या पहिल्या तिमाहीत, जीडीपी वाढीचा दर 13.5 टक्के आहे परंतु तो आरबीआय (RBI) च्या 16.2 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 13 टक्के, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार तो 15.7 टक्के असेल असे म्हटले होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 2020-21 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीला कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र यावेळी तसे झाले नाही. 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीत चीनचा विकास दर 0.4 टक्के राहिला आहे.

एनएसओने जारी केलेल्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राचा विकास दर 4.8 टक्के राहिला आहे, तर 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत तो 49 टक्के होते. 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 4.5 टक्क्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्राचा विकास दर 2.2 टक्के राहिला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास दर 16.8 टक्के राहिला आहे, जो 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत ते 71.3 टक्के होता. (हेही वाचा: सीरम इन्स्टिट्युटची भारतीय बनावटीची पहिली qHPV लस 1 सप्टेंबरला होणार लॉन्च - सुत्र)

त्याचप्रमाणे, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवांचा वाढीचा दर 25.7 टक्के आहे, जो 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 34.3 टक्के होता. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा वाढीचा दर 9.2 टक्के राहिला, जो गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 2.3 टक्के होता. दरम्यान, 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्र सरकारची वित्तीय तूट 3.41 लाख कोटी रुपये होती. हे चालू आर्थिक वर्षातील एकूण उद्दिष्टाच्या 20.5% आहे. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 21.3 टक्के होता.