Idukki Landslide: केरळच्या इडुक्की भूस्खलनातील मृत्यूंची संख्या पोहोचली 48 वर; मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (7 ऑगस्ट) इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील राजामाला (Rajamala) येथे झालेल्या भीषण भूस्खलनातील मृतांचा आकडा आता 48 वर पोहोचला आहे.

Idukki landslide in Kerala. (Photo Credit: ANI/Twitter)

केरळ (Kerala) मध्ये मुसळधार पावसामुळे राज्यात पूर आणि भूस्खलनाची (Landslide) समस्या उभी राहिली आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (7 ऑगस्ट) इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील राजामाला (Rajamala) येथे झालेल्या भीषण भूस्खलनातील मृतांचा आकडा आता 48 वर पोहोचला आहे. सोमवारी पाच मृतदेह सापडले आहेत, तर रविवारी ढिगाऱ्याखाली 17 मृतदेह सापडले आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक भागात पूरसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजामाला या भागात राहणाऱ्या महिला, चहाच्या बागांमध्ये काम करतात तर बहुतेक पुरुष जीप चालक म्हणून काम करतात.

दरड कोसळल्यानंतर इथल्या कामगारांच्या घराची मोडतोड झाली. यातील बहुतेक मजूर तामिळनाडूमधील असल्याचे समजते. घटनेनंतर ताबडतोब मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफ, केरळ पोलिस, वैद्यकीय पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले होते. या भूस्खलनात अजूनही बरेच लोक अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफची टीम सातत्याने कार्यरत आहे. केरळ सरकारने हवाई बचाव पथक घटनास्थळावर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु खराब हवामानामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. (हेही वाचा: Kozhikode Plane Crash मध्ये मृत्यु झालेल्या Co- Pilot अखिलेश कुमार यांच्या घरी लवकरच येणार होता चिमुकला पाहुणा)

एएनआय ट्वीट -

सरकारच्या म्हणण्यानुसार, भूस्खलन झालेल्या ठिकाणी 78 लोक राहत होते. यापैकी 12 जणांना वाचविण्यात आले असून 48 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित लोकांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये दोन मुले आणि पाच महिलांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत रक्कम जाहीर केली आहे. याशिवाय पंतप्रधान मदत निधीतून मृत्यू झालेल्यांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याचेही पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. दरम्यान, केरळमधील कोट्टायम, इडुक्की, वायनाड भागात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. 11 ऑगस्टपर्यंत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.