Hubballi Shocker: कर्नाटकातील हुबळी येथे पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; घटस्फोटाचा अर्ज करून करत होती 20 लाख रुपयांची मागणी

पीटर एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या वैवाहिक जीवनातील कलहामुळे तो बराच काळ त्रस्त होता. पीटरच्या मृत्यूने दुखावलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी पिंकीवर गंभीर आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याचा मानसिक आणि भावनिक छळ करत होती.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

कर्नाटकातील (Karnataka) हुबळी (Hubballi) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळुरूच्या अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणासारखीच आहे. हुबळीमध्ये पत्नीच्या छळामुळे एका व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केली. या व्यक्तीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये त्याने आत्महत्येबद्दल वडिलांची माफी मागितली असून, पत्नी पिंकीने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. पीटर असे पिडीत व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी सांगितले की, पीटरच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या अर्जात पीटरकडून 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पत्नीच्या घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीच्या एक दिवस आधी पीटरने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीटर एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या वैवाहिक जीवनातील कलहामुळे तो बराच काळ त्रस्त होता. पीटरच्या मृत्यूने दुखावलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी पिंकीवर गंभीर आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याचा मानसिक आणि भावनिक छळ करत होती. एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या पिंकीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जेव्हा पीटर आणि त्याच्या कुटुंबाने पिंकीकडे तिच्या अफेअरबद्दल विचारणा केली तेव्हा तिने, ‘हे माझे जीवन असून ते मी हवे तसे जगेन’, असे सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पीटर आणि पिंकी जवळपास आठ महिन्यांपासून वेगळे राहत होते. हळू हळू त्यांचे नाते बिघडत चालले होते. पिंकीने पीटरपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि पोटगी म्हणून 20 लाख रुपयांची मागणी करत होती. त्यानंतर तर पीटर आणखीनच नैराश्येत गेला.

पीटरच्या भावाने सांगितले की, रविवारी ते सर्व चर्चला गेले होते. दुपारी 12:30 वाजता ते परत आले तेव्हा, पीटरने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. त्याच्या मृतदेहाजवळ एक नोट सापडली, ज्यामध्ये पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे. माहितीनुसार, पीटरने आपल्या आई-वडिलांना आपल्या शवपेटीवर 'मृत्यूचे कारण' म्हणून 'पत्नीचा छळ' लिहिण्यास सांगितले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement