GST Evasion Scam: लोकप्रिय शेमारू एंटरटेनमेंट आणि पदाधिकाऱ्यांवर 133.60 कोटींचा जीएसटी चोरीचा आरोप; कर चुकवण्यासाठी तयार केल्या 20 बोगस कंपन्या
तपासादरम्यान, मारूने कबूल केले की तो, गाडा आणि हरिया अनेक डमी कंपन्या तयार करण्यास जबाबदार होते आणि त्यांनी कोणत्याही वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी केवळ कागदावर माजी कर्मचाऱ्यांच्या नावावर या फर्म्स तयार केल्या.
Shemaroo Entertainment GST Evasion Scam: केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने (GST) शेमारू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (Shemaroo Entertainment Pvt Ltd) आणि तिचे पदाधिकारी- सह व्यवस्थापकीय संचालक अतुल मारू, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक हिरेन गडा आणि मुख्य वित्तीय अधिकारी अमित हरिया यांच्यावर 20 बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 133.60 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा आरोप केला आहे. मारु, गडा आणि हरिया यांना 6 सप्टेंबर 2023 रोजी जीएसटी फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी विभागाने सत्र न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर सुनावणी प्रलंबित आहे. एजन्सीने आरोप केला आहे की हे तिघे कथित फसवणुकीचे सूत्रधार आहेत, ज्यांनी सरकारचे नुकसान केले आहे. विभागाने नुकतीच फर्म आणि तिच्या अधिका-यांविरुद्ध फिर्यादी तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये एकूण 20 बोगस कंपन्या तयार केल्याचा आरोप आहे. याद्वारे त्यांनी 133.60 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला. (हेही वाचा: Supreme Court On Stridhan: पत्नीचे स्त्रीधन म्हणजेच तिचे सोने, पैसा आणि संपत्तीवर पतीचा कोणताही अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)
विभागाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी म्हणजेच शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड, मारू, गाडा आणि हरिया यांनी फसव्या व्यावसायिक संस्था स्थापन आणि त्या व्यवस्थापित करण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडने, 20 बोगस कंपन्यांनी कोणत्याही वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता उभारलेल्या इनव्हॉइसच्या जोरावर एकूण 70.25 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आहे. त्यानंतर शेमारू एंटरटेनमेंटने कोणत्याही वस्तू/सेवांचा पुरवठा न करता एकूण 63.34 इतके इनपुट टॅक्स क्रेडिट दिले आहे. त्यांनी 20 बोगस कंपन्यांद्वारे जमा केलेल्या पावत्याच्या बळावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली.
तपासादरम्यान, मारूने कबूल केले की तो, गाडा आणि हरिया अनेक डमी कंपन्या तयार करण्यास जबाबदार होते आणि त्यांनी कोणत्याही वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी केवळ कागदावर माजी कर्मचाऱ्यांच्या नावावर या फर्म्स तयार केल्या.