Coronavirus विरूद्ध लढण्यासाठी सरकारने बदलले धोरण; आता हॉस्पिटलमधील 'या' रुग्णांचीही होणार तपासणी
सरकारने निर्णय घेतला आहे की, आता सर्व रूग्णालयात न्यूमोनियाच्या (Pneumonia) रुग्णांची तपासणी केली जाईल
कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनीती बदलली आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की, आता सर्व रूग्णालयात न्यूमोनियाच्या (Pneumonia) रुग्णांची तपासणी केली जाईल. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी आदेश जारी केला आहे की, न्यूमोनिया झालेल्या सर्व रुग्णांची माहिती एनसीडीसी किंवा आयडीएसपीला कळवावे, जेणेकरुन त्यांची कोरोना व्हायरसची तपासणी करता येईल. शुक्रवारी रुग्णालयांना देण्यात आलेल्या आदेशामध्ये सरकारने म्हटले आहे की, 'कोणत्याही रुग्णालयातून संशयित कोरोना व्हायरस रूग्णास परत जाऊ देऊ नका. तसेच अशा प्रकारच्या रुग्णांच्या भरतीबद्दल एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) किंवा आयडीएसपीला माहिती द्यावी.
सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की, ‘न्यूमोनियाच्या सर्व रुग्णांची माहिती देण्यासोबत, रुग्णालयांनी त्यांच्या आवारात सामाजिक अंतर सुनिश्चित केले पाहिजे’. पूर्वी, कोरोनाचा संसर्ग हा परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आल्याने वाढत होता. मात्र आता ही परिस्थती राहिली नाही, त्यामुळे सरकार सतर्क आहे. मंत्रालयाच्या मते, न्यूमोनिया ग्रस्त रूग्णांसाठी कोरोना विषाणू प्राणघातक ठरू शकतो. असा अंदाज आहे की भारतातील विविध रुग्णालयात न्यूमोनियाचे सुमारे 2 लाख रुग्ण आहेत. दोन आठवड्यांत सर्व नमुन्यांची तपासणी केल्यानंतर, रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना कोरोना विषाणूची लागण आहे की नाही हे समोर येईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझर च्या किंमती निश्चित केल्या; जाणून घ्या नवे दर)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना, पर्याप्त प्रमाणात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मास्क खरेदी करण्यास सांगितले आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील गर्दी कमी करण्याचा आदेश दिला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार करण्याची गरज आहे.