Global Hunger Index 2021: धक्कादायक! भारतामध्ये अन्नटंचाई, देशातील उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली
अशा परिस्थितीत, भारतातील 14% लोकसंख्या कुपोषित असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच, 15 ते 49 वर्षे वयाच्या 51.4% स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता आहे.
उपासमारीबाबत (Starvation) नुकताच एक अहवाल समोर आला आहे, ज्याचे आकडे भारतासाठी चिंतेचा विषय आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये (Global Hunger Index 2021) भारताचे नाव अत्यंत खालच्या क्रमांकावर गेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपासमारीच्या बाबतीत भारताशी तुलना केल्यास पाकिस्तान, नेपाळसारखे देश खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. 116 देशांच्या या यादीमध्ये भारत 101 व्या स्थानावर घसरला आहे. याबाबतीत तो त्याचे शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. 2020 मध्ये भारत 94 व्या क्रमांकावर होता.
भारतातील उपासमारीची पातळी 'चिंताजनक' असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार नेपाळ (76), बांगलादेश (76), म्यानमार (71) आणि पाकिस्तान (92) हे भारताच्या पुढे आहेत. या सर्व देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यात भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. या सूचीमध्ये पाचपेक्षा कमी GHI स्कोअरसह चीन, ब्राझील आणि कुवैतसह 18 देश आघाडीवर आहेत. (हेही वाचा: Petrol-Diesel Price Today: आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर)
भारतानंतर पापुआ न्यू गिनी (102), अफगाणिस्तान (103), नायजेरिया (103), कांगो (105), मोझाम्बिक (106), सिएरा लिओन (106), तिमोर-लेस्ते (108), हैती (109), लाइबेरिया (110), मादागास्कर (111), डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (112), चाड (113), सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (114), येमेन (115) आणि सोमालिया या देशांची स्थिती अत्यंत खराब आहे.
इंडिया फूड बँकिंग अहवालानुसार, भारतातील 189.2 दशलक्ष लोक कुपोषित आहेत. अशा परिस्थितीत, भारतातील 14% लोकसंख्या कुपोषित असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच, 15 ते 49 वर्षे वयाच्या 51.4% स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील पाच वर्षांखालील 34.7% मुलांची उंची वयापेक्षा कमी आहे, तर 20% मुलांचे वजन त्यांच्या उंचीपेक्षा फार कमी आहे. कुपोषित मुलांमध्ये अतिसार, निमोनिया आणि मलेरिया सारख्या सामान्य बालपणातील आजारांमुळे मृत्यूचा धोका जास्त असतो.
याआधी 'राइड टू फूड' मोहिमेने देशातील 11 राज्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांना देशात लॉकडाऊन दरम्यान उपाशी राहावे लागले आहे. अशा लोकांची संख्या सुमारे 27 टक्के होती. त्याच वेळी, याच सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की, या काळात सुमारे 71 टक्के लोकांच्या अन्नात पौष्टिकतेची कमतरताही दिसून आली. अगदी 45 टक्के लोकांना त्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेसाठी कर्ज घ्यावे लागले. PEW च्या एका अहवालात म्हटले आहे की, साथीच्या काळात जगभरात गरिबीच्या पातळीवर पोहोचलेले 60 टक्के लोक भारतातील आहेत.