Faridabad Shocker: तब्येत खराब असूनही शाळेने सातवीच्या मुलीला जबरदस्तीने परीक्षेला बसवले; दुसऱ्या दिवशी झाला मृत्यू

वर्ग संपेपर्यंत आराध्या दुपारी दीड वाजेपर्यंत शाळेतच राहिली. घरी परतत असताना तिला बसमध्ये पुन्हा उलटी झाली आणि यासह सीटवर माती टाकल्याबद्दल ड्रायव्हरने तिला फटकारले.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

हरियाणाच्या फरिदाबाद (Faridabad) जिल्ह्यात एका खाजगी शाळेच्या निष्काळजीपणामुळे इयत्ता सातवीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्यांची मुलगी आजारी होती. ती आजारी असूनही शाळेने मुलीला परीक्षेला बसण्यास भाग पाडले. शाळेने मुलीच्या आरोग्याबाबत आपल्याला अंधारात ठेवल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. बुधवारी सकाळी मुलीने वर्गशिक्षकांना सांगितले की, तिची तब्येत ठीक नाही. असे असूनही मुलगी आराध्या खंडेलवाल हिला तिची गणिताची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वर्गात बसवले गेले आणि नंतर रुग्णालयात जाण्याची परवानगी देण्यात आली.

मुलीच्या वर्गमित्राच्या आईने TOI ला सांगितले की, त्यांची मुलगी आराध्याची चांगली मैत्रीण होती. या मुलीने आपल्या आईला सांगितले की, सकाळपासून आराध्याची तब्येत ठीक नव्हती. जेव्हा आराध्याने तिच्या वर्गशिक्षिकेला उलट्या होत असल्याचे सांगितले तेव्हा तिला वॉशरूमला जाण्याची परवानगी देण्यात आली. अस्वस्थ वाटत असतानाही आराध्याला परीक्षेला बसवले गेले. पूर्णवेळ तिला घाम फुटत होता. यावेळी आराध्याला स्वतः चालता येत नव्हते आणि तिचे डोळेही बंद होत होते.

मुलीची प्रकृती इतकी बिघडली असूनही शाळेने पालकांना याची माहिती दिली नाही. वर्ग संपेपर्यंत आराध्या दुपारी दीड वाजेपर्यंत शाळेतच राहिली. घरी परतत असताना तिला बसमध्ये पुन्हा उलटी झाली आणि यासह सीटवर माती टाकल्याबद्दल ड्रायव्हरने तिला फटकारले. आराध्याचे वडील अभिलाष खंडेलवाल यांनी सांगितले की, घरी परतल्यानंतर आराध्याने लिंबूपाणी मागितले. एक तासानंतर साडेतीन वाजता ती वॉशरूममध्ये गेली आणि तिला पुन्हा उलटी झाली. त्यावेळी तिची तब्येत बरी नसल्याचे त्यांना समजले. पण त्यावेळी त्यांना वाटले की त्या दिवशी पहिल्यांदाच तिने उलटी केली. शाळेत काय घडले याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

त्यानंतर याबाबत कुटुंबातील बालरोगतज्ज्ञांना माहिती दिली व नंतर त्यांनी काही औषधे लिहून दिली. या औषधांनी संध्याकाळी तिला बरे वाटत असल्याचे तिने तिच्या पालकांना सांगितले आणि ती झोपी गेली. गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास आराध्याला पुन्हा उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे ईसीजी करण्यात आला. त्यानंतर काही वेळाने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा: Uttar Pradesh Viral Video: पायाने दाबले मुलाचे नरडे, आरपीएफ जवानाचे संतापजनक कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई)

शाळेने आदल्या दिवशी सकाळी आपल्या मुलीच्या प्रकृतीची माहिती दिली असती तर तिच्यावर वेळीच उपचार करता आले असते, असे पालकांनी सांगितले. आता पोलीस याचा तपास करीत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ते सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करतील आणि कोणत्याही तपासात सहकार्य करतील.