खोट्या FASTag चा सुळसुळाट; फास्टॅगच्या फसवणुकीबाबत NHAI जारी केला अलर्ट, जाणून घ्या नक्की कुठे खरेदी कराल
जर आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल तर आपल्या कारला फास्टॅग असणे बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला टोल भरण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच आपल्या कारवर फास्टॅग नसल्यास आपण ते शक्य तितक्या लवकर लावून घेतले पाहिजे
भारत सरकारने टोल टॅक्ससाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. जर आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल तर आपल्या कारला फास्टॅग असणे बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला टोल भरण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच आपल्या कारवर फास्टॅग नसल्यास आपण ते शक्य तितक्या लवकर लावून घेतले पाहिजे. फास्टॅगच्या अनिवार्यतेमुळे त्याची विक्रीदेखील लक्षणीय वाढली आहे आणि यामुळेच त्याबाबत होणारी फसवणूक देखील वाढत आहे. म्हणूनच फास्टॅग घेताना सतर्क राहणे आवश्यक आहे. एनएचएआय (NHAI) अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही बनावट फास्टॅगच्या वाढत्या प्रकरणाबाबत अलर्ट जारी केला आहे.
एनएचएआयने माहिती दिली आहे की, एनएचएआय किंवा आयएचएमसीएलच्या नावावर बनावट फास्टॅग विकले जात आहेत. हे फास्टॅग दिसायला अगदी एनएचएआय किंवा आयएचएमसीएलच्या फास्टॅगप्रमाणेच आहेत, मात्र त्यांचा काही उपयोग होणार नाही. वैध ऑनलाइन फास्टॅग केवळ www.ihmcl.co.in या वेबसाइटवर किंवा MyFASTag App द्वारे खरेदी केले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त ग्राहक फास्टॅग बँक व अधिकृत पीओएस बँकेच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. जिथून फास्टॅग खरेदी केले जाऊ शकतील अशा बर्याच वेबसाइटची माहिती आयएचएमसीएल वेबसाइटवर दिली गेली आहे.
कोणत्याही अज्ञात ठिकाणाहून कोणीही फास्टॅग करू नये अशी माहितीही एनएचएआयने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. फास्टॅग फसवणुकीची कोणतीही घटना समोर आल्यास एनएचएआयची हेल्पलाईन 1033 वर संपर्क साधा किंवा etc.nodal@ihmcl.com वर माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Earn from Home Online: 'या' 5 मार्गाने तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता; जाणून घ्या काय करावं लागेल काम)
म आणि एन श्रेणीच्या वाहनांसाठी शासनाने फास्टॅग अनिवार्य केले आहे. यात चारपेक्षा जास्त चाके असलेली वैयक्तिक वाहने किंवा माल वाहून नेणारी वाहने समाविष्ट आहेत. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, आपण टोल पास करताच आपल्या फास्टॅग खात्यातून पैसे कट केले जातात, ज्याची माहिती एसएमएसद्वारे आपल्या मोबाइलवर दिली जाते. मेसेजमध्ये टोलचे नाव, तारीख, रक्कम आणि फास्टॅग शिल्लक याबद्दल माहिती आहे.