Fake Cryptocurrency Exchanges: बनावट क्रिप्टो एक्सचेंज फ्रॉडमध्ये भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची फसवणूक; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

भारतीय सायबर सिक्युरिटी कंपनी CloudSEK ने माहिती दिली की, बनावट क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि अँड्रॉइडवर आधारित बनावट क्रिप्टो अॅप्लिकेशन्सचे अनेक डोमेन आढळून आले आहेत.

Cryptocurrency (Photo Credits-Twitter)

जर का तुम्ही क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. नुकतेच बनावट क्रिप्टोकरन्सीचे प्रकरण समोर आले असून, बनावट क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, अशा बनावट क्रिप्टो एक्सचेंजच्या बाबतीत भारतीयांचे आतापर्यंत $128 दशलक्ष (सुमारे 1,000 कोटी रुपये) नुकसान झाले आहे.

याबाबत भारतीय सायबर सिक्युरिटी कंपनी CloudSEK ने माहिती दिली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, बनावट क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि अँड्रॉइडवर आधारित बनावट क्रिप्टो अॅप्लिकेशन्सचे अनेक डोमेन आढळून आले आहेत. या ठिकाणी अशा बनावट मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. क्रिप्टो एक्सचेंज CoinEgg या नावाने एक नवीन बनावट वेबसाइट तयार करण्यात आली आहे, जी यूकेची सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना विविध प्रकारची आमिषे दिली जातात व नंतर त्यांची फसवणूक केली जाते.

लाइव्ह मिंटने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, अहवालात असे म्हटले आहे की, फसवणुकीसाठी स्कॅमर बनावट क्रिप्टो एक्सचेंज व्यासपीठे तयार करतात, जी कायदेशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसारखी दिसतात. हे स्कॅमर नंतर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतात आणि अशा प्लॅटफॉर्मला भेट देण्यासाठी स्वागत ऑफर म्हणून $100 क्रेडिट देतात. त्याद्वारे वापरकर्त्यांचा विश्वास संपादन करून नंतर त्यांची फसवणूक केली जाते. (हेही वाचा: आता Social Media Influencers तसेच डॉक्टरांना भरावा लागू शकतो 10 टक्के टीडीएस, 1 जुलै पासून नवा नियम लागू, जाणून घ्या सविस्तर)

CloudSEK चे मुख्य कार्यकारी राहुल सासी यांच्या मते, वापरकर्त्यांनी अशा प्लॅटफॉर्मवर स्वतःचा निधी जमा केल्यावर, या प्लॅटफॉर्मवरील सर्व ट्रेडिंग आणि पैसे काढण्याच्या सुविधा बंद केल्या जातात. गोठवलेली मालमत्ता पुनर्प्राप्त करण्यासाठी, स्कॅमर पीडितांना ईमेलद्वारे आयडी कार्ड आणि बँक तपशील यासारखी गोपनीय माहिती प्रदान करण्याची विनंती करतात. या तपशिलांचा वापर नंतर पुढची फसवणूक करण्यासाठी केली जाते. बनावट क्रिप्टोकरन्सीमध्ये 50 लाख रुपयांचे ($64,000) नुकसान झालेल्या पीडितेने CloudSEK शी संपर्क साधला होता, त्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या.