Atishi Criticized BJP: ईडीने आजपर्यंत कोणताही पुरावा सादर केलेला नाही, हे सर्व भाजपचे कारस्थान आहे; केजरीवाल यांच्या अटकेवर आतिशी यांची प्रतिक्रिया

ईडीने आजपर्यंत कोणताही पुरावा सादर केलेला नाही, हे सर्व भाजपचे कारस्थान आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, असंही आतिशी यांनी यावेळी नमूद केलं.

आप नेत्या आतिशी (PC - X/ANI)

Atishi Criticized BJP: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेवर आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्या आतिशी (Atishi) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांची अटक म्हणजे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न आहे. केजरीवाल ही एक कल्पना आहे, प्रेरणा आहे. ईडीने न्यायालयात पुरावे सादर केले नाहीत. भाजपच्या सांगण्यावरून ही अटक करण्यात आल्याचं आतिशी यांनी म्हटलं आहे. भाजप केजरीवालांना घाबरत आहे. ईडीने आजपर्यंत कोणताही पुरावा सादर केलेला नाही, हे सर्व भाजपचे कारस्थान आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, असंही आतिशी यांनी यावेळी नमूद केलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आले आहे. सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे की, क्रांती दडपशाहीने थांबत नाही. केजरीवाल यांच्या संपूर्ण कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. (हेही वाचा -Arvind Kejriwal Arrested: अरविंद केजरीवाल यांना अटक; अबकारी धोरण प्रकरणी ईडीची कारवाई)

दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. आंदोलक पक्षाचे ज्येष्ठ नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच इम्रान हुसेन आणि पंजाबचे मंत्री हरजोत बैंस यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

निदर्शनादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी बसेस आणल्या आहेत. या बसेसमध्ये कार्यकर्त्यांना नेले जात आहे. त्याचबरोबर ईडी कार्यालयाजवळही कलम 144 लागू करण्यात आले आहे.