मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; सात लाख गोळ्या, 1,400 हून अधिक इंजेक्शन्स आणि कफ सिरपच्या बाटल्या जप्त

त्यांच्याकडून सात लाखाहून अधिक गोळ्या आणि 1,400 हून अधिक इंजेक्शन्स आणि कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत

Drugs Representative Image (Photo Credits: PixaBay)

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) मादक पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून सात लाखाहून अधिक गोळ्या आणि 1,400 हून अधिक इंजेक्शन्स आणि कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत बोलताना एनसीबी दिल्लीचे प्रादेशिक संचालक केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, 'महिन्याभर चाललेल्या कारवाईत पोलिसांनी टोळीतील तीन जणांना अटक केली असून त्यांचे जाळे उत्तर प्रदेशातील आग्रा आणि पंजाबमधील लुधियाना येथे पसरले होते. त्यांच्याकडून एकूण 7,24,840 गोळ्या आणि कॅप्सूल, 1400 इंजेक्शन्स आणि 80 सीबीसीएस (कोडिन-आधारित खोकला सिरप) बाटल्या जप्त केल्या आहेत.'

ही औषधे बेकायदेशीर मार्गाने तस्करांना पाठविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग्राच्या शाहगंज परिसरातील एका गोदामातून ही औषधे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेल्या गोळ्यांमध्ये 2.87 लाख अधिसूचित औषध ट्रामाडोल गोळ्यादेखील समाविष्ट आहेत. केंद्र सरकारने 2018 मध्ये नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत, या औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवले आणि काउंटरवर विक्री करण्यास बंदी घातली. (हेही वाचा: Narcotics Control Bureau ची मोठी कारवाई; भारतातून 100 कोटी तर ऑस्ट्रेलियामधून 1 हजार 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त)

दुसरीकडे महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) वर्षभरात अशाप्रकारचे औषधांच्या बेकायदेशीर विक्रीवरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे 7 हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. नशेसाठी कफ सिरपचा वापर फार वाढला आहे. कफ सिरपची संपूर्ण बाटली आल्याने गुंगी येते त्यामुळे याचा वापर फार वाढला आहे. आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मात्र 2019 मध्ये 7 हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.