Cyclone Shaheen: शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीला धडकण्याची शक्यता कमी; मात्र अनेक राज्यात मुसळधार पावसाचा IMD चा इशारा
गुजरातच्या किनारपट्टीकडील भागात याचा प्रभाव जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) क्षमल्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर आता शाहीन चक्रीवादळाचा (Cyclone Shaheen) धोका निर्माण झाला आहे. गुजरातच्या (Gujarat) किनारपट्टीकडील भागात याचा प्रभाव जाणवेल, असा भारतीय हवामान विभागाचा (India Meteorological Department) अंदाज आहे. तसंच शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्याने ते धडकण्याची शक्यता कमी आहे. परंतु, त्याच्या प्रभावामुळे गुजरात आणि सौराष्ट्रच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री किंवा शनिवारी पहाटे शाहीन चक्रीवादळ तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. हे भारतीय किनारपट्टीला धडण्याची शक्यता कमी असली तरी गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो.
ANI Tweet:
दक्षिण गुजरातवरील कमी हवेचा दाब असलेले क्षेत्र चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना 3 ऑक्टोबर पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गुजरातमधील द्वारका येथून पश्चिम उत्तर दिशेला 255 किमी, कराची येथून दक्षिण पश्चिम दिशेला 180 किमी आणि बंदरगाह (इराण) येथून पूर्व दक्षिण दिशेला 660 किमी वर अरबी समुद्रामध्ये मोठा दबाव दिसून येत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे पुढील काही तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असून अरबी समुद्रात ईशान्येला तीव्र स्वरुप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान 90 ते 110 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. दरम्यान, शाहीन चक्रीवादळ पाकिस्तान-मकरान किनाऱ्याच्या दिशेने सरकून भारतीय किनाऱ्यापासून दूर जाईल, असा अंदाज आहे.