एकांत शोधण्याच्या नादात चक्क रेल्वेरुळावरील मालगाडीच्या खाली जाऊन बसले प्रेमीयुगुल, रेल्वेने ट्विट करुन प्रवाशांना दिली ताकीद
या फोटोमध्ये एक प्रेमीयुगुल एकांत शोधण्याच्या नादात चक्क रेल्वेरुळावर उभ्या असलेल्या मालगाडी खाली जाऊन बसले आहे.
प्रेम आंधळं असतं हे आपण सर्वांना ऐकल असेलच. पण ते इतके आंधळे असतं की ते व्यक्त करण्यासाठी आपण कोणत्या ठिकाणी आहोत हे सुद्धा दिसत नाही का? आम्ही असं म्हणण्यामागे कारणही तसच आहे. सध्या सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्या फोटोची खुद्द रेल्वे मंत्रालयाने दखल घ्यावी लागली आहे. झाले असे की, या फोटोमध्ये एक प्रेमीयुगुल एकांत शोधण्याच्या नादात चक्क रेल्वेरुळावर उभ्या असलेल्या मालगाडी खाली जाऊन बसले आहे.
हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने खास ट्विट करुन रेल्वे प्रवाशांना सक्त ताकीद दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाचे ट्विट:
रेल्वे प्रशासनाने असे म्हटले आहे की, हा प्रकार खूपच धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. कृपया अशाप्रकारे मालगाडी उभी असताना रेल्वे रुळावर बसण्याचे धाडस कधीही करु नका. अशी मालगाडी कोणतीही पूर्वसूचना न देता चालू होऊ शकते. त्यामुळे तुमचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच अधिकृत रेल्वे फाटकातून प्रवास करावा. नेहमी सतर्क राहा आणि सुरक्षित राहा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
हेही देखील वाचा- डोंबिवली: शॉर्टकट मारण्याचा मोह जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू
रेल्वे प्रवासी अवैधरित्या रेल्वेरूळ ओलांडणे, रेल्वे रुळांवर शौचास बसणे यांसारखे अनेक प्रकार करत असतात. पण यामुळे त्यांच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. हे होऊ नये म्हणून रेल्वेने दिलेल्या नियमांचे कृपया उल्लंघन करू नका असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. त्यात आता हा नवीन प्रकार पाहून रेल्वे प्रशासनालाही डोक्यावर हात मारण्याची वेळ आलीय.